सोलापूरातील एटीएमची सुरक्षा वाºयावर, केवळ सीसीटीव्ही अन् पोलिसांवर मदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:22 PM2017-11-18T13:22:32+5:302017-11-18T13:25:35+5:30
नवी मुंबईतील बँक आॅफ बडोदाची शाखा भुयार खणून फोडून चोरट्यांनी लॉकरमधील लाखो रुपयांचे दागिने लुटले. याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील विविध बँकांची मध्यरात्री पाहणी केली असता, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि एक-दोन खासगी बँकांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही बँकांनी रात्री सुरक्षा व्यवस्था ठेवलेली दिसली नाही
अमित सोमवंशी
सोलापूर दि १८ : नवी मुंबईतील बँक आॅफ बडोदाची शाखा भुयार खणून फोडून चोरट्यांनी लॉकरमधील लाखो रुपयांचे दागिने लुटले. याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील विविध बँकांची मध्यरात्री पाहणी केली असता, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि एक-दोन खासगी बँकांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही बँकांनी रात्री सुरक्षा व्यवस्था ठेवलेली दिसली नाही. काही एटीएमवर सुरक्षारक्षक नेमण्यात आले असले तरी सुरक्षेसाठी त्यांच्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते, अशीही वस्तुस्थिती ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान पाहणीत आढळून आली. शहरातील बहुतांशी बँकांच्या सुरक्षेचा पूर्णत: भार शहर पोलिसांवरच असल्याची बाब समोर आली आहे.
शहरातील कुठल्याच बँकांमध्ये पूर्णवेळ सुरक्षा कर्मचारी नाहीत. केवळ बँकांच्या कामकाजाच्या वेळांमध्ये सुरक्षा उपलब्ध असते. जे एटीएम बँकांना लागून आहेत त्या सुरक्षारक्षकांनाच रात्रीच्या वेळी एटीएमसोबतच बँकांकडेही लक्ष ठेवण्यास सांगितले जाते, काही बँका तर केवळ सीसीटीव्हीच्या भरवशावर असल्याचे दिसून आले आहे.
शहरातील सगळ्या बँकांमध्ये स्ट्राँग रूम आहे. त्या ठिकाणी जाण्यास सर्वसामान्यांसह बँकेतील कर्मचाºयांना मज्जाव असतो. लोकमत टीमने गुरुवारी मध्यरात्री एमआयडीसी, फौजदार चावडी, जेलरोड, सदर बझार, विजापूर नाका व जोडभावी पेठ या सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील विविध बँकांची पाहणी केली असता, शहरातील बँकांची सुरक्षा सध्या रामभरोसे दिसली. शहराच्या वाढत्या विस्तारासोबत बँकिंग क्षेत्रही झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रत्येक परिसरात राष्ट्रीयीकृत बँकांच्याही शाखा दिसायला लागल्या आहेत. शाखा विस्तारत असल्या तरी त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक वेळा शहरातील एटीएम मशीन फोडण्याचाही प्रयत्न झाला आहे. तरीही बँकांच्या बाहेर सुरक्षारक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. बहुतेक एटीएम आणि बंद बँकांबाहेरील लाईट सुरु होते; मात्र किरकोळ नागरिक वगळता अन्य ठिकाणी शुकशुकाट दिसला.
बँक आॅफ बडोदाच्या बाहेर काहीजण झोपले होते.कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएमचे शटर अर्धवट झाकून आत एक सुरक्षारक्षक खुर्चीवर बसलेला होता. नई जिंदगी परिसरात रात्री दीड वाजता एक महिला पोलीस अधिकारी पथकासह पेट्रोलिंग करीत होत्या. एचडीएफसी एटीएमच्या बाहेर एक जण झोपलेला होता. विजापूर रोडवरील बँक आॅफ इंडिया एटीएमसमोर दोघे जण गप्पा मारत बसलेले होते. एम्प्लॉयमेंट चौकातील डीसीबी एटीएमच्या बाहेर सुरक्षारक्षक तैनात होता. अशोक पोलीस चौकी परिसरात रात्री दोन पोलीस कर्मचारी बँक आॅफ इंडियाच्या एटीएमला भेट देऊन तेथील रजिस्टरवर सह्या करत होते. तर आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमसमोर बेवारस कुत्र्यांनी ठिय्या दिला होता. फेडरल बँके च्या एटीएम बाहेर सुरक्षागार्ड तैनात होता. रात्री पोलिसांची गस्त मात्र सुरू होती. वाढलेले मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या पाठीमागे धावत होते.
------------------
शहरात अनेक एटीएम सुरक्षारक्षकाविना आहेत
शहरात विविध बँकांची एटीएम केंद्रे आहेत. त्यातील ८५ टक्के एटीएम केंद्रावर सुरक्षारक्षकच नसल्याची बाब समोर आली आहे. काही ‘एटीएम’ च्या ठिकाणी सुरक्षारक्षक असतो. मात्र, त्याच्याकडे सुरक्षेसाठी काठीव्यतिरिक्त पुरेशी साधने नाहीत. बंदूकधारी सुरक्षारक्षक ठेवण्यासाठी बँका उत्सुक नाहीत.
----------------------
या ठिकाणी केली पाहणी
शहरातील आसरा चौैक, जुळे सोलापूर, डी मार्ट चौैक, दावत चौैक, भारती विद्यापीठ परिसर, सैफुल, महावीर चौैक, सात रस्ता, कुमठा नाका, नई जिंदगी, गुरुनानक चौैक, डफरिन चौैक, आंबेडकर चौैक, जिल्हा परिषद, शिवाजी चौैक, अशोक चौैक, वाडिया हॉस्पिटल, किल्ला रोड,जुना एम्प्लॉयमेंट चौैक, विजापूर रोड, बाळीवेस , मधला मारुती, कुंभार वेस, कोंतम चौैक येथे असलेल्या बँकांच्या एटीएमला गुरुवारच्या रात्री १२ ते ३ च्या दरम्यान भेट देऊन पाहणी केली असता,हे चित्र दृष्टीस पडले.
----------------------
पोलीस करतात बँकांची सुरक्षा
शहरातील बँका व एटीएमची सुरक्षा संबंधित पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस कर्मचारी रात्री करत असल्याचे पाहणीत दिसून आले. रात्रीच्या वेळी पेट्रोलिंगदरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचारी संबंधित एटीएमची पाहणी करून तिथे असलेल्या रजिस्टरवर सही करतात. बँकांसमोर काही वेळ थांबून पुढच्या पॉर्इंटवर निघून जातात.
---------------------------
करमाळ्यात सीसीटीव्हीवरच सुरक्षेचा भार
करमाळा : करमाळयात राष्ट्रीय बँंकांसह सहकारी बँंकांची सुरक्षा रामभरोसे असून सीसीटीव्ही यंत्रणेवरच बँंकांची सुरक्षा अवलंबून आहे. करमाळा शहरात बँंक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडिया, युनियन बँंक, बँंक आॅफ महाराष्ट्र, आयडीबीआय, आयसीआयसीआय, विदर्भ-क ोकण या बँंकांसह जिल्हा मध्यवर्ती बँंक, बारामती सह. बँंक, श्ांकरराव मोहिते-पाटील सह. बँंक, करमाळा अर्बन बँंक, लोकमंगल, ब्रह्मदेव माने बँंक, माढेश्वरी यासह नागरी सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत. दररोज करोडो रुपयांची उलाढाल होणाºया या बँंकाची सुरक्षा रामभरोसे असून केवळ सीसीटीव्ही यंत्रणेवर बँंकांची सुरक्षा अवलंबून आहे. राष्टÑीयकृत बँंकात दिवसा सुरक्षा रक्षक तैनात असल्याचे दिसून येतात पण बँंकाच्या समोर रात्री कोणतीही सुरक्षा यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसून येत नाही. तालुक्यातील ग्रामीण भागात वीट, कोर्टी, जिंती, जेऊर, चिखलठाण, केम, साडे या गावात बँंकाची सुरक्षा असून नसल्यासारखी आहे. कधी कोणता धोका होईल सांगता येत नाही.
---------------------------
माढ्यातील तीन बँका, एटीएमला सुरक्षारक्षक
माढा: माढा शहरातील तीन बँकांना चोवीस तास सिक्युरिटी गार्ड आहेत तर एका एटीएमला सिक्युरिटी गार्ड आहे. इतर एटीएमला फक्त सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.
माढ्यातील राष्ट्रीयीकृत तीनही बँका एकाच चौकात आहेत. माढा-कुर्डूवाडी रोडवर, माढा पोलीस ठाण्यासमोर, माढा तहसील कार्यालय रोड व माढा न्यायालय रोडलगत या बँका आहेत. माढा पोलीस ठाण्यासमोरच स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, युनियन बँक या बँकांचे एटीएम आहेत. माढा स्टेट बँकेत चार सुरक्षारक्षक आहेत. सीसी टीव्ही कॅमेरेही आहेत. युनियन बँकेला दिवसा सुरक्षारक्षक नाही. सीसीटीव्ही कॅमेरे, सायरन, रात्री एटीएम व बँकेसाठी सुरक्षारक्षक आहे. बँक आॅफ इंडियाही सीसीटीव्हीच्या कक्षेत तर सायरनची सोय आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची सीसीटीव्ही व सायरनवरच भिस्त आहे. माढेश्वरी अर्बन बँकेत २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे व सायरनची सोय आहे.