केशर, गावराण आंब्यांची झाडे मोहराने बहरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:54 AM2021-01-13T04:54:36+5:302021-01-13T04:54:36+5:30
सांगोला तालुक्यात ८० हेक्टर क्षेत्रावर केशर, हापूस, गावराण अशा विविध जातीच्या आंब्याच्या बागा लावल्या आहेत. थंडी आंब्यासाठी पोषक समजली ...
सांगोला तालुक्यात ८० हेक्टर क्षेत्रावर केशर, हापूस, गावराण अशा विविध जातीच्या आंब्याच्या बागा लावल्या आहेत.
थंडी आंब्यासाठी पोषक समजली जात असल्याने जानेवारीत आंब्याची झाडे मोहराने बहरली आहेत. गेल्या काही वर्षापासून वादळी वारे व अवकाळी पावसामुळे आंब्याच्या उत्पादनांवर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आला आहे. यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाल्यामुळे सर्वच झाडांवर नवी पालवी फुटली आहे. आंब्याची झाडे मोहराने बहरल्यामुळे यावर्षी आंब्याचे उत्पादन निश्चितच वाढणार आहे.
शेतकरी आता पिक पद्धत बदलू लागला आहे. शासकीय योजनेतून लागवड केल्याने माळरानावर केशर आंब्याचा बोलबाला दिसून येत आहे. लागवडीचे योग्य व्यवस्थापन आणि फळांची काळजी घेतल्याने हापूसप्रमाणे केशर आंबा खाण्यास चविष्ट असतो, असा शेतकऱ्यांचा दावा आहे.
ठिबकद्वारे बागांसाठी पाण्याचे नियोजन
तालुक्यातील वाकी-शिवणे, एखतपूर, महूद, चिकमहूद, खिलारवाडी, हलदहिवडी, शिवणे, अकोला, शिरभावी, धायटी आदी गावात केशर आंब्याचे उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत. शेतकऱ्यांनी एक एकर ते पाच एकरापर्यत केशर आंब्याच्या बागा ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे योग्य नियोजन करून बागा जोपासल्याचे चित्र दिसून येते.
फोटो ओळ : शिवणे (ता. सांगोला) येथील बाळासाहेब जानकर यांच्या शेतातील केशर आंब्याची बाग मोहराने बहरल्याचे छायाचित्र.