‘भीमा’च्या रणांगणात सतेज पाटील यांचा शड्डू
By admin | Published: March 6, 2016 01:04 AM2016-03-06T01:04:01+5:302016-03-06T01:04:01+5:30
प्रतिष्ठेची निवडणूक : परिचारक यांच्या ‘परिवर्तन आघाडी’ला पाठबळ
राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर
भीमा सहकारी साखर कारखाना, मोहोळ (जिल्हा सोलापूर)च्या रणांगणात आमदार सतेज पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. आमदार प्रशांत परिचारक यांच्यासमवेत ‘परिवर्तन आघाडी’ला पाठबळ देत खासदार धनंजय महाडिक यांना सोलापुरात जाऊन आव्हान दिले आहे.
महादेवराव महाडिक व सतेज पाटील यांच्यातील शह-काटशहाचे राजकारण आता सोलापुरातही पोहोचल्याने ‘भीमा’ कारखान्याची निवडणूक सोलापूरकरांसह कोल्हापूरकरांच्या प्रतिष्ठेची बनली आहे.
महादेवराव महाडिक व आमदार सतेज पाटील या गुरुशिष्यांमधील वाद सर्वश्रुत आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीत अमल महाडिक यांना सतेज पाटील यांनी विरोध केला आणि त्याचे पडसाद २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उमटले. महादेवराव महाडिक यांनी अमल महाडिक यांना दक्षिण मतदारसंघात उतरवून अध्यक्षपदाच्या पराभवाचे उट्टे काढले. तेव्हापासून तर हा वाद विकोपाला गेला असून, महाडिक यांच्या प्रत्येक निवडणुकीत कडवा विरोध करण्याची एकही संधी पाटील यांनी सोडली नाही. महाडिक यांच्या राजकारणाचे प्रमुख सत्ताकेंद्र असणाऱ्या ‘गोकुळ’ व राजाराम साखर कारखाना निवडणुकीत तर सतेज पाटील यांनी महाडिक यांना घाम फोडला.
महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेतून बाजूला करून पाटील यांनी महाडिक यांची गोची केली. महापालिका निवडणुकीत महाडिक यांनी ‘ताराराणी-भाजप’मागे सगळी रसद लावली; पण सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीला सोबत घेत महापालिकेत सत्ता स्थापन केली. त्यानंतर झालेली विधानपरिषद निवडणूक संपूर्ण राज्यात गाजली. साम, दाम, दंड या नीतीचा निवडणुकीत कसा वापर केला जातो, याची प्रचिती कोल्हापूरकरांना आली.
अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत पाटील यांनी एकतर्फी विजयी खेचत महाडिक यांच्या अठरा वर्षांच्या साम्राज्याला हादरा दिला.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने पाटील यांना पाठिंबा दिला असला तरी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी महादेवराव महाडिक यांचा उघड प्रचार केला होता. त्यामुळे जिथे-जिथे महाडिक यांची सत्ताकेंद्रे आहेत, त्या-त्या ठिकाणी आव्हान देण्याचा चंगच पाटील यांनी बांधला आहे.
भीमा साखर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. उमेदवारी पात्र-अपात्र करण्यावरून सोलापूरचे राजकारण तापले आहे.
गतनिवडणुकीत खासदार महाडिक यांनी आमदार भारत भालके यांना सोबत घेऊन विरोधकांशी निकराची झुंज देत कारखान्याची सत्ता काढून घेतली.
निवडणूक सोलापूरकरांसह कोल्हापूरकरांच्या प्रतिष्ठेची
महाडिक व पाटील यांच्यातील कोल्हापुरातील वाद आता सोलापुरात पोहोचल्याने ‘भीमा’ची निवडणूक सोलापूरकरांबरोबरच कोल्हापूरकरांच्याही प्रतिष्ठेची बनली आहे. याबाबत खासदार धनंजय महाडिक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.