'त्या' हत्याकांडाला वर्ष पूर्ण; पण कुटुंबीय मदतीपासून वंचितच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 04:24 AM2019-07-01T04:24:29+5:302019-07-01T08:10:10+5:30

आठवडे बाजारात सोशल मीडियावर मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा पसरली होती.

Saheb, fill the stomach with money, give the job! | 'त्या' हत्याकांडाला वर्ष पूर्ण; पण कुटुंबीय मदतीपासून वंचितच

'त्या' हत्याकांडाला वर्ष पूर्ण; पण कुटुंबीय मदतीपासून वंचितच

Next

- विलास मासाळ

मंगळवेढा (जि़ सोलापूर) : साहेब, चार पैशानं पोट भरतं का ओ, शासनानं हाताला काम द्यावं, आम्हाला अजूनही रेशनकार्ड नाही, कोणतेही दाखले मिळत नाहीत, असे सांगत धुळे जिल्ह्यातील राईनपाडा हत्याकांडातील घटनेच्या आठवणीने भटक्या विमुक्त जमातीतील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पीडित नातेवाईकांना गहिवरून आले अन् त्यांनी आक्रोश सुरू केला. आठवडे बाजारात सोशल मीडियावर मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा पसरली होती. त्यातून हे सामूहिक हत्याकांड झाले.

मंगळवेढा तालुक्यातील खवे व मानेवाडी येथील भारत भोसले, दादाराव भोसले, भारत माळवे, अगनू इंगोले व राजू भोसले हे पाच जण १ जुलै २०१८ रोजी राईनपाडा (ता़ साक्री, जि. धुळे) येथे भिक्षा मागण्यासाठी गेले असताना लहान मुलांना पळवून नेणारी टोळी समजून ग्रामस्थांनी त्यांना अमानुषपणे मारहाण केली़ त्यात पाच जणांचा मृत्यू झाला़ शासनाने मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली. शिवाय मृतांच्या कुटुंबातील प्रत्येकी एकाला नोकरीत समावून घेतले जाईल. कुटुंबाचे पुनर्वसन केले जाईल. शेतजमीन देण्यात येईल, अशी घोषणा शासनाने केली होती. पण त्यांच्या पदरी काहीच मिळाले नसल्याची खंत वारसदार नर्मदा भोसले, संगीता भोसले, शांता माळवे यांनी व्यक्त केली.

वर्ष उलटूनही अद्याप आठ जण फरारच
धुळे : राईनपाडा गावात आजही तणावाची स्थिती आहे़ संशयित २८ जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून ८ फरार संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मंगळवेढा तालुक्यातील चार आणि कर्नाटक राज्यातील एक अशा पाच जणांची हत्या करण्यात आली. घटनेनंतर राईनपाडा आणि परिसरातील ग्रामस्थ, तरुण फरार झाले होते. येथील आठवडे बाजार मात्र अजून सुरू झालेला नाही़

रेशनकार्ड मिळाले नाही
मृतांचे नातेवाईक शांता माळवे, दिगंबर माळवे, नर्मदा भोसले, सुनील भोसले, लक्ष्मण भोसले, मारूती भोसले, शहानूर फकीर यांची अवस्था फारच बिकट आहे़ घटनेनंतर अनेक राजकीय पुढारी, नेत्यांनी आश्वासने दिली़ मात्र वर्षभरात साधे रेशन कार्डही मिळाले नाही़ जातीच्या दाखल्यासह अन्य दाखलेही मिळेनात़ रोजगारासाठी सर्वांना भटकंती करावी लागत आहे़, असे कुटुंबीयांनी सांगितले.

देवानं नव्हं दुष्ट लोकांनी मारलं...
शासनाच्या पैशापेक्षा आयुष्यभर साथ देणारा जोडीदार गेला़ आमच्या यांना देवानं नव्हं तर दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी मारलं़ त्यांच्याशिवाय आमचं जीवन पूर्ण होत नाही़ शासनानं आयुष्यभर पैसा दिला तरी मानसिक समाधान होत नाही़ आमची अनेक वर्षांपासून परवड सुरू आहे़ आता तर त्यात जास्तच भर पडल्याचे सीताबाई माळवे सांगत होत्या़ त्यांच्या डोळ््यात पाणी आलं होतं.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये़ कायदा हातात घेण्याचा कोणीही प्रयत्न करु नये़ राईनपाडासह परिसरात जनजागृती करण्यात आली आहे़ २८ संशयितांना जेरबंद केले आहे़ सरकारी वकील म्हणून अ‍ॅड़ उज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे़ - विश्वास पांढरे, पोलीस अधीक्षक, धुळे

Web Title: Saheb, fill the stomach with money, give the job!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.