Video: साहेब प्लिज...! वारकऱ्यांनी आग्रह केला अन् एकनाथ शिंदेंची विखे-पाटलांसोबत फुगडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 11:01 AM2023-06-29T11:01:24+5:302023-06-29T11:17:05+5:30
पूजा सुरू असतानाही वारकऱ्यांसाठी मुखदर्शन एक मिनिटही बंद ठेवलं नाही हे आवर्जून सांगावं लागेल, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
आज आषाढी एकादशी. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या भक्तीत तल्लीन होऊन हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपुरात आलेल्या लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या पहाटे विठूनामाचा गजर सुरू केला आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक आणि मानाचे वारकरी भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे २.५७ मिनिटांनी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पार पडली.
शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाकडे बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊ देत. पाऊस चांगला पडू दे. राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असे मागणे मागितले. तसेच महापूजेनंतर आयोजित सत्कार सोहळ्यामधये मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या विकास आराखड्यासह इतर अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण भाष्य केले. वारकरी बंधूंनी सहकार्य केले त्यांचे मी आभारी आहे. पूजा सुरू असतानाही वारकऱ्यांसाठी मुखदर्शन एक मिनिटही बंद ठेवलं नाही हे आवर्जून सांगावं लागेल, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यावेळी फुगडी देखील खेळताना दिसून आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या वतीने पंढरीमध्ये प्रदूषण मुक्त वारी पंढरीच्या द्वारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील देखील सहभागी झाले होते. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी टाळ वाजवत विठू नामाचा गजर केला. तसेच वारकऱ्यांनी साहेब प्लिज, प्लिज म्हणत फुगडी खेळण्याचा आग्रह केला. त्यानंतर वारकरऱ्यांच्या विनंतीला मान देत एकनाथ शिंदे यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत फुगडी देखील खेळली.
पंढरपूर: एकनाथ शिंदे यांनी टाळ वाजवत विठू नामाचा गजर केला. तसेच वारकऱ्यांच्या आग्रहखातर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत फुगडी देखील खेळली. @mieknathshindepic.twitter.com/svc3lJYscw
— Lokmat (@lokmat) June 29, 2023
दरम्यान, आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून भाविकांची आरोग्य सेवा करता आली हे आमच्यासाठी विठ्ठल पुजेसारखेच आहे. या वर्षीच्या वारीत स्वच्छतेचे चांगले काम झाले आहे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. शासनाने दिलेल्या सूचनांनुसार प्रशासनाने उत्तम नियोजन करून वारकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांचा मुख दर्शनाच्या रांगेत शासकीय पूजेच्या वेळात खोळंबा होवू नये म्हणून या काळात मुख दर्शन रांग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रांगेतील वारकऱ्यांचे दर्शन जलद व सुलभ झाल्याचेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.