सैराट फेम 'आर्ची' १२ ऑक्टोबरला मंगळवेढ्यात येणार; जाणून घ्या काय आहे कारण ?
By Appasaheb.patil | Published: October 7, 2022 04:41 PM2022-10-07T16:41:41+5:302022-10-07T16:41:58+5:30
रविवारपासून मंगळवेढ्यात रंगणार युवा महोत्सव! सोलापूर विद्यापीठाकडून कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा युवा महोत्सव दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालय, मंगळवेढा येथे होणार असून रविवार ९ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
रविवारी सकाळी दहा वाजता पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थित उद्घाटन सोहळा होणार आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता एकांकिका रंगमंचाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते होईल. ९ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत नृत्य, नाट्य, ललित, वांग्मय, संगीत विभागातील एकूण २९ कलाप्रकारांचे सादरीकरण या युवा महोत्सवात होणार आहे. सुमारे ७५ महाविद्यालये आणि जवळपास दोन हजार विद्यार्थी, कलाकारांचा यामध्ये सहभाग राहणार आहे.
युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत नोंदणी, उद्घाटन सोहळा, संघ व्यवस्थापनकांची बैठक, मूकनाट्य, समूहगीत, कातरकाम, प्रश्नमंजुषा लेखी, मराठी-हिंदीइंग्रजी वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन, भितीचित्रण, रांगोळी आणि एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे. सोमवार, १० ऑक्टोबर रोजी शास्त्रीय नृत्य, सुगम गायन, पथनाट्य, स्थळचित्रण, वादविवाद, फोक आर्केस्ट्रा, शास्त्रीय सुरवाद्य, कथाकथन, मिमिक्री, स्पॉट फोटोग्राफी, एकांकिका (मराठी, हिंदी) आदी स्पर्धा पार पडतील. मंगळवार ११ ऑक्टोबर रोजी प्रश्नमंजुषा तोंडी, निर्मिती चित्र, शास्त्रीय गायन, व्यंगचित्रण, लघुनाटिका, शास्त्रीय तालवाद्य, मातीकाम आणि लोकनृत्याच्या स्पर्धा रंगतील.
बुधवार, दि. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता शोभायात्रा पार पडल्यानंतर सकाळी अकरा वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. सैराट फेम सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक दिली जाणार आहेत. या पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ कळवणे, पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे आदी उपस्थित होते.
वॉटरप्रूफ मंडप, साउंड, निवास, भोजन व्यवस्था चोख
यंदाच्या युवा महोत्सवाचे यजमान दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. सुजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, परीक्षक, मान्यवर यांच्या भोजन, निवास आदी व्यवस्थेचे चोख नियोजन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे मुख्य रंगमंच आणि इतर स्पर्धेसाठी चार ते पाच मोठे रंगमंच संपूर्ण वॉटरप्रूफ मंडप मारून तयार करण्यात आले आहे. कलाप्रकार सादरीकरणासाठी उत्तम साऊंड व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी कलाकारांना कोणतीच अडचण भासणार नसल्याचा विश्वास विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ कळवणे यांनी व्यक्त केला आहे.