पालकमंत्र्यांचे सिध्देश्वरांकडे साकडे; कोरोनाचे संकट दूर होऊ दे सोलापूरचे वैभव पुन्हा येऊ दे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:16 PM2021-01-13T16:16:36+5:302021-01-13T16:16:41+5:30
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे श्री सिद्धरामेश्वरांकडे साकडे
सोलापूर : वर्षभरापासून कोरोनाची जागतिक महामारी सुरू आहे. देशातील, राज्यातील, जिल्ह्यातील कोरोनाचे संकट दूर होऊन पुन्हा सोलापूरला गतवैभव प्राप्त होऊ दे, असे साकडे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्री सिद्धरामेश्वरांकडे घातले.
आज सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त अक्षता सोहळ्याचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी भरणे पत्रकारांशी बोलत होते. कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार घालण्यात आलेल्या अटीनुसार पारंपरिक अक्षता सोहळा पार पडला. यावेळी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्यासह देवस्थान पंच कमिटीचे सदस्य, मानकरी उपस्थित होते.
भरणे यांनी पालखीतील मुर्तींचे दर्शन घेतले. अक्षता सोहळ्याला उपस्थिती लावून सिद्धेश्वर मंदिरातही दर्शन घेतले. भरणे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील जनता सुखी होऊ दे, असा आशीर्वाद मागितला आहे. अजून कोरोनाचे संकट संपले नाही. लसीकरण मोहीम सुरू होईल, लस दिली तरीही नागरिकांनी गाफिल न राहता सर्वांनी कुटुंबासह स्वत:ची काळजी घ्यावी. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असून टप्प्याटप्प्याने सर्वांना लस दिली जाणार आहे. पुढचे दोन-तीन महिने कठिण आहेत, शासकीय नियमाचे पालन केले तर कोरोना हद्दपार होईल.
देवस्थानच्या विकासासाठी प्रयत्नशील
कोरोनामुळे प्रशासनाने मानकरी आणि काही भक्तांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे इतर राज्यासह, जिल्ह्यातील भक्तांना उपस्थित राहता आले नाही, दर्शन करता आले नाही. पुढच्या वर्षी नियोजनपूर्वक यात्रा साजरी करूया. सिद्धरामेश्वर मंदिर देवस्थानच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असेही भरणे यांनी सांगितले.
पंच कमिटीतर्फे सन्मान
पालकमंत्री भरणे यांचा पंच कमिटीतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, मिलिंद थोबडे, पुष्कराज काडादी यांच्यासह पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.