सखुबाईच्या अंत्ययात्रेला खांदेकरीही मिळाला नाही..अखेर टेम्पोतून गाठली स्मशानभूमी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 02:17 PM2020-03-26T14:17:56+5:302020-03-26T16:10:38+5:30
coronavirus; कोरानाची भीती अन् पोलिसांच्या काठीची दहशत
सोलापूर: सखुबाई नारायण खरात (वय ६० वर्षे) बीबीदारफळ येथील रहिवासी. मेंदुचा आजार झाला अन् सखुबाईवर उपचार सुरू केले. त्यातच अर्धांगवायुनेही सखुबाईला गाठले. औषधोपचार सुरू असतानाच सखुबाईने बुधवारी सायंकाळी ६ वाजता जीव सोडला. ‘कोरोना’च्या दहशतीमुळे अगोदरच वातावरण गंभीर असतानाच सखुबाईचे निधन झाले. संचारबंदी लागू असल्याने बाहेरगावचे पाहुण्यांना येण्याची अडचण. वाहने आहेत तर डिझेल नाही अन् दोन्ही आहे तर पोलिसांच्या माराची भिती. ही परिस्थिती असली तरी काहीही करुन अंत्यसंस्कार उरकावेच लागणार.
मुलगा औदुंबर व सुभाषने आई गेल्याचे खैराव येथील मामांना कळविले. खुनेश्वर, बाळे, कोळेगाव व गावातील बहिनी निरोप मिळाल्याने लागलीच आईच्या प्रेताजवळ हजर झाल्या. चुलते सुरेश व विठ्ठल यांनी वहिनिच्या प्रेताची तयारी केली. आता खांदकरी कोण? असा प्रश्न उपस्थित झाला. दोन मामा, दोन चुलते, औदुंबर व सुभाष, दोन मुले, चार मुली अन् चार जावयांनी एक माल वाहतुक टेंम्पो मागविला व प्रेत स्मशानभूमीत घेऊन गेले. मोजक्याच १०- १५ लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाची भिती त्यातच १३ व्या दिवसापर्यंतच्या विधीला व गोडधोड जेवणाला जावे लागणार असल्याने खांदेकरीही होण्यास कोणी पुढे आले नाही.