सोलापूर जिल्हा परिषदेतील १२० दांडीबहाद्दरांची पगार कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:27 PM2018-05-18T12:27:06+5:302018-05-18T12:27:06+5:30
सर्व विभागातील हजेरी पुस्तकाची तपासणी करण्याचे आदेश दिले.
सोलापूर : साहेब नाहीत म्हटल्यावर आपलेच राज्य समजून निवांतपणे कामावर येणाºया आणि दांडी मारणाºया कर्मचाºयांना जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी कारवाईचा दणका दिला. सकाळी कामावर गैरहजर असलेल्या १२० कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचे आदेश त्यांनी दिले.
जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख गुरुवारी वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने बाहेर होते. अधिकारी नसले की कर्मचारी कामावर निवांतपणे येतात किंवा कामाला दांडीही मारतात. महापालिकेतील विषय समित्यांची निवडणूक गुरुवारी झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड निवडणूक निर्णय अधिकारी होते.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे बैठकीसाठी पुण्याला गेले होते. इतर दोन उपमुख्य कार्यकारी अधिकारी बैठकीसाठी बाहेरगावी तर दोन अधिकारी रजेवर होते. खाते प्रमुख कार्यालयात येणार नसल्याने आजचे काम निवांतपणेच चालेल, असा कर्मचाºयांचा अंदाज होता. मात्र सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी सकाळी १० वा. कार्यालय गाठले. सर्व विभागातील हजेरी पुस्तकाची तपासणी करण्याचे आदेश दिले. यानंतर डॉ. भारुड तत्काळ महापालिकेककडे रवाना झाले.
...आणि गाडी वळविण्यास सांगितले
- महापालिकेच्या विषय समित्यांची निवडणूक प्रक्रिया सकाळी १०.३० वा. सुरू होणार होती. त्यासाठी डॉ. भारुड घरातून लवकर निघाले होते. सात रस्त्यापर्यंत आल्यानंतर त्यांनी चालकाला गाडी जिल्हा परिषदेकडे वळविण्यास सांगितले. सकाळी १० वा. ते आपल्या कार्यालयात हजर झाले. यादरम्यान साहेबांची गाडी पाहून काही कर्मचाºयांची पळापळ झाली. कार्यालयात आल्यानंतर त्यांनी हजेरी पुस्तकाची तपासणी करण्याचे आदेश दिले. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडून सायंकाळी परतल्यानंतर १२० कर्मचाºयांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
विभागनिहाय गैैरहजर कर्मचारी
- सामान्य प्रशासन विभाग १८, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना ३, समाजकल्याण ९, पाणी व स्वच्छता १२, ग्रामीण पाणीपुरवठा ५, ग्रामपंचायत ४, पशुसंवर्धन १, महिला व बालकल्याण ३, प्राथमिक शिक्षण विभाग १६, बांधकाम विभाग क्र. १ : ४, अर्थ विभाग ६, लघु पाटबंधारे १, बांधकाम क्र. १ : ८, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ३, माध्यमिक शिक्षण विभाग ७, आरोग्य १२, कृषी ८.