साेलापूर महापालिकेचा नगरसेवकांना फोन; ऑक्सिजन बेड शिल्लक, रुग्णांना पाठवून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 12:32 PM2021-05-19T12:32:55+5:302021-05-19T12:33:01+5:30
ग्रामीणचा वाढतोय ओढा - नगरसचिव कार्यालयातून नगरसेवकांना निरोप
सोलापूर : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड शिल्लक आहेत. आपल्या प्रभागातील रुग्णाला गरज असेल तर पाठवून द्या, असे निरोप नगरसचिव कार्यालयाकडून नगरसवेकांना दिले जात आहेत.
महापालिका प्रशासनाने हिंगलमाता बॉईस नागरी आरोग्य केंद्रात ७० बेड, काडादी मंगल कार्यालयात १०० तर राज्य विमा कामगार रुग्णालयात १०० ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले आहेत. खासगी रुग्णालये २५ ते ५० हजार रुपये ॲडव्हान्स भरल्याशिवाय दाखल करुन घेत नाहीत. मात्र पालिकेच्या या रुग्णालयांमध्ये रुग्णांवर मोफत उपचार होत आहेत. या रुग्णालयातून बरे होण्याचे प्रमाणही सर्वाधिक आहे. महापौर श्रीकांचना यन्नम, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे व त्यांचे सहकारी दर दोन दिवसाला या केंद्रातील कामांचा आढावा घेतात.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही बॉईस हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन बेड कमी पडू लागल्यानंतर राज्य विमा कामगार व काडादी मंगल कार्यालयात बेड वाढविण्यात आले. काडादी सेंटर सर्वात सुरू झाले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शहर व ग्रामीण भागातील रुग्ण दाखल होतात. या ठिकाणी बेड शिल्लक नसेल तर ग्रामीण भागातील रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. पालिकेच्या सेंटरमध्ये शहरातील रुग्ण यावेत यासाठी आयुुक्त पी. शिवशंकर यांनी नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांना सर्व नगरसेवकांना फोन करुन बेड उपलब्ध असल्याची माहिती कळविण्यास सांगितले. दंतकाळे यांनी मंगळवारी बहुतांश नगरसेवकांना फोनही केले होते. पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध असले तरी व्हेंटिलेटर बेडचा शोध कायम आहे.
अशी होती कालची स्थिती
राज्य विमा कामगार रुग्णालयात मंगळवारी १०० पैकी ३९ बेड शिल्लक होते. या ठिकाणी शहरातील २९ तर ग्रामीण भागातील ३२ रुग्ण दाखल होते. काडादी मंगल कार्यालयातील सेंटरमध्ये १०० पैकी ४९ बेड शिल्लक होते. या ठिकाणी शहरातील २५ तर ग्रामीण भागातील २६ जण दाखल होते. बॉईस हॉस्पिटलमध्ये बहुतांश शहरातील रुग्ण होते.
मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांच्या प्रयत्नातून बॉईस व ईएसआयमध्ये पालिकेची यंत्रणा उभी राहिली. ऑक्सिजनच्या कमरतेमुळे काडादी मंगल कार्यालयात सेंटर सुरू व्हायला वेळ लागला. कोरोनाची तिसरी लाट विचारात घेता या सेंटर्सची आवश्यकता आहे. चांगल्या उपचारांसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
- धनराज पांडे, उपायुक्त, मनपा.