विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून अर्ज विक्री सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:47 PM2019-09-27T12:47:37+5:302019-09-27T12:51:22+5:30
सोलापूर जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण; तहसील कार्यालयांमध्ये केली सोय
सोलापूर : जिल्ह्यातील अकरा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकारण्याच्या प्रक्रियेस शुक्रवार दि. २७ सप्टेंबरपासून सुरूवात करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील अकरा विधानसभेच्या जागेसाठी २७ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या कालावधीत अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी ३०० अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. अर्जासोबत प्रतिज्ञापत्राचा नमुना उपलब्ध करण्यात आला आहे. निवडणूक उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया राबविण्यासाठी सर्व निवडणूक कार्यालयात तयारी करण्यात आली आहे.
पार्किंग व्यवस्थेपासून अर्ज विक्री व स्वीकृती टेबलावर फलक, संबंधित अधिकाºयांची नावे ठळकपणे लावण्यात आली आहेत. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळात सुटीचे दिवस वगळून हे कामकाज चालणार आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी ५ आॅक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ७ आॅक्टोबरपर्यंत आहे. या दिवशी निवडणूक रिंगणात कोण कोण असतील हे चित्र स्पष्ट होणार आहे.
विधानसभा मतदानसंघासाठी प्राधिकृत केलेले अकरा निवडणूक अधिकाºयांनी प्रशासकीय तयारी पूर्ण केली आहे. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना विविध परवाने देण्याच्या कामकाजास सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा कक्षाची स्थापना करण्यात आली असून, नोडल अधिकारी म्हणून पंकज जावळे, बसवराज बिराजदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदार संघाच्या निवडणूक कार्यालयातील एक खिडकीमध्ये परवान्यासाठी अर्ज करावयाचे आहेत. परवान्यामध्ये वाहन, प्रचार कार्यालये, सभा, फलक लावणे व पत्रके छापण्याच्या परवान्यासाठी अर्ज येण्यास सुरूवात झाली आहे. वाहन परवान्यासाठी आरटीओ तर सभा, ध्वनीक्षेपक परवान्यासाठी पोलीस, महापालिकेची एनओसी आवश्यक आहे.
सोलापुरात तीन ठिकाणी सोय
- सोलापुरात दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात दक्षिण सोलापूर, उत्तर तहसीलमध्ये शहर मध्य व दक्षिण सोलापूर खरेदी कार्यालयाशेजारी शहर उत्तर विधानसभेसाठी अर्ज विक्री व स्वीकृतीची सोय करण्यात आली असल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले यांनी सांगितले.