जिद्दीला सलाम; बाळाचं तोंड पाहण्यासाठी त्या मातेने ‘कोरोना’ ला हरवलं...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 12:33 PM2020-05-26T12:33:07+5:302020-05-26T12:40:15+5:30
प्रसूतीनंतर एका गोंडस मुलाला जन्म देणारी आई बाळापासून होती दूर; कसेबसे आयसोलेशन वॉर्डात ११ दिवस त्या मातेने काढले
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिची सर्वप्रथम कोरोना टेस्ट झाली. दरम्यान, प्रसूती वेदना सुरू होऊन तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर बाळाचीही टेस्ट घेतली. बाळाचा रिझल्ट निगेटिव्ह आल्यानंतर बाळाला घरी पाठवले, तर आईला आयसोलेशन वॉर्डात उपचाराकरिता पाठवले.
आईने कोरोनावर केली मात
त्या जिद्दी मातेला रविवारी संध्याकाळी शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जेव्हा ती आई घरी परतली तेव्हा तिच्या बाळाला पाहिल्यानंतर तिने तिच्या आनंदाश्रूंना मोकळी वाट करून दिली. परतल्यानंतर तिने ‘लोकमत’शी संवाद साधला. ती म्हणाली, १२ मे रोजी माझी प्रसुती झाली. मला मुलगा झाला याचा आनंद होताच. सोबत मला आयसोलेशन वॉर्डात घेऊन जाणार, अशी चर्चा डॉक्टरांमध्ये सुरू होती. १३ मे रोजी मला कोरोना झाल्याचे कळले. त्यावेळी सर्वप्रथम मला माझ्या बाळाची चिंता लागून राहिली. लगेच बाळाचीही टेस्ट घेतली. सुदैवाने बाळाची टेस्ट निगेटिव्ह आली. मी थोडी निश्चिंत झाले. पण मनात मोठी धाकधूक लागून राहिली. पुन्हा बाळाकडे जायचे आहे, याच तीव्र इच्छेने मी कोरोनावर तुटून पडले. डॉक्टर जे सांगतील ते करत गेले. अकरा दिवसांत मी कोरोनामुक्त झाले. डॉक्टरांनीही माझे कौतुक केले.
लोकांनी आम्हाला गुन्हेगार ठरवलं!
बाळंतपणासाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मला कोरोना झाल्याचे कळाले. माझे माहेर नीलम नगर येथील असून, सासुरवाडी नवीन विडी घरकूल येथील आहे. माहेर आणि सासरजवळचा परिसर सील करण्यात आला. कोरोना झाल्यानंतर आम्हाला लोकांनी दूर लोटलं. संपर्क तोडला. आमच्या हातून एखादा मोठा गुन्हा घडल्याची भावना आमच्या मनात निर्माण झाली. आम्ही आतून खूप दुखावलो गेलो. पण यातून सुखरूप बाहेर पडू, अशी आशाही होती. कुठल्याही रुग्णाशी अशी वर्तणूक करू नका. कोरोना हा काय महाभयानक रोग नाही. यातून कोणीही बरा होऊ शकतो, असे ती महिला म्हणाली.