समाधान आवताडे यांनी घेतली आमदारकीची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:23 AM2021-05-13T04:23:02+5:302021-05-13T04:23:02+5:30
विधानसभेचे उपाध्यक्ष आणि हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आवताडेंना गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी भाजप आमदार प्रशांत परिचारक, खासदार रणजितसिंह ...
विधानसभेचे उपाध्यक्ष आणि हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आवताडेंना गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी भाजप आमदार प्रशांत परिचारक, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते. कोरोना महामारीमुळे सध्या मोठ्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच, यापूर्वीचे अधिवेशनही ठराविक काळापुरतेच घेण्यात आले होते. त्यामुळे समाधान आवताडे यांचा शपथविधी सोहळाही मोजक्याच लोकांमध्ये घेण्यात आला.
मी समाधान आवताडे शपथ घेतो की... असे म्हणत आवताडे यांनी पहिल्यांदाच आमदारकीची शपथ घेतली. तत्पूर्वी, पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत विजयी घोषित केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना समाधान आवताडे यांनी, लोकांची ताकद आमच्या पाठीशी होती. हा विजय जनतेचा आहे, असे म्हटले होते. तसेच, निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीकडून जनतेवर दबाव होता. महाविकास आघाडीने अनेक गोष्टींचा वापर केल्याने माझे मताधिक्य कमी झाले आहे, असेही आवताडे यांनी सांगितले.
विजयाचं श्रेय भाजप नेत्यांना
दरम्यान, पंढरपूरच्या तुलनेत मंगळवेढ्यामधून कमी मताधिक्य मिळालं का, असं विचारलं असता, दोन्ही तालुक्यांमधून आपल्याला मताधिक्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या विजयामागे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या इतर अनेक नेत्यांचे योगदान आहे. त्यांनी साथ दिल्याने हा विजय झाला, असे आवताडे यांनी सांगितले.