मराठा समाजाच्या सरसकट ओबीसी समावेशासाठी संभाजी ब्रिगेडचा लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:23 AM2021-05-07T04:23:01+5:302021-05-07T04:23:01+5:30
भीमानगर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर त्याचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. सुप्रीम कोर्टात हा ...
भीमानगर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर त्याचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. सुप्रीम कोर्टात हा विषय न टिकल्याने आता मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा, यासाठी यापुढे संभाजी ब्रिगेड लढा उभारण्याची भूमिका सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी जाहीर केली.
गेल्या २० वर्षांपासून महाराष्ट्रातील लाखो मराठे आणि मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा ही मागणी करीत आहे. याबाबत प्रत्येक सरकारच्या काळात अनेक आंदोलने झाली. सरकारसोबत विरोधी पक्षांनादेखील यासाठी साकडे घातले. मात्र, संभाजी ब्रिगेडच्या या मागणीकडे प्रत्येक सरकारने व विरोधी पक्षांनी साफ दुर्लक्ष केले. यात विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात आहे. शैक्षणिक नुकसान होत आहे. समाजाची एक पिढी या प्रक्रियेत वाया गेली आहे. अनेकांचे बलिदान गेले. मराठा समाजातील अनेक तरुणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.
असे असताना आता मराठा आरक्षणदेखील सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरविले आहे. मराठा समाजामध्ये ५ टक्के श्रीमंत वर्ग आहे तर ९५ टक्के मराठा समाज हा गरीबच आहे. त्यामुळे सरकारने संभाजी ब्रिगेडच्या मागणीची दखल घेऊन तत्काळ निर्णय घ्यायला पाहिजे अशी मागणी सचिन जगताप यांनी केली आहे.