शाहरुख खानाच्या 'जवान'मधील डायलॉगमुळे ट्रोल होत आहात, असे विचारताच समीर वानखेडे भडकले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 07:06 PM2023-09-09T19:06:08+5:302023-09-09T19:06:57+5:30
सचिन कांबळे - पंढरपूर : जवान’ या चित्रपटात शाहरुख खानचा एक डायलॉग आहे. त्यात तो म्हणतो, “बेटे को हाथ ...
सचिन कांबळे -
पंढरपूर : जवान’ या चित्रपटात शाहरुख खानचा एक डायलॉग आहे. त्यात तो म्हणतो, “बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर.” शाहरुखचा हाच डायलॉग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावरून नेटकऱ्यांकडून ट्रोल होत असल्यासंदर्भात विचारले असता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे भडकले आणि त्यांनी, ते कोण आहेत? मी कुणालाही घाबरत नाही. विठ्ठलाचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे, असे म्हटले आहे.
विठ्ठलाच्या दर्शनासाठी वानखेडे हे सप्तनीक पंढरपूर येथे आले होते. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ॲड. किर्तीपाल सर्वगोड, विशाल मांदळे, रुपेश वाघमारे उपस्थित होते.
ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केली होती. यामुळे डायलॉगद्वारे शाहरुखने समीर वानखेडे यांना टोला लगावल्याचं म्हटलं जात आहे. त्यावर वानखेडे यांना विचारल्यावर त्यांनी संतप्त प्रतिक्रया दिली.
पुढे ते म्हणाले, मी केस संदर्भात काही सांगू शकत नाही. परंतु आपली न्यायप्रणाली खूप भक्कम व चांगली आहे, माझा न्यायप्रणालीवर पूर्ण विश्वास आहे. लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे. त्याचबरोबर माझ्यावर विठ्ठलाचा आशीर्वाद असून तो राहणारच आहे. मी जनतेचा सेवक आहे. जी मला संधी मिळेल त्यातून मी सेवा करणार आहे.
- नशा मुक्त अभियानावर अधिक लक्ष -
सध्याची परिस्थिती पंतप्रधान व गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली नशा मुक्त अभियानावर अधिक लक्ष दिले जात असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.
निवडणूक लढवण्यासंदर्भात बोलणे टाळले -
सध्या आपण सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे. हे करे आहे का असे त्यांना विचारल्यास त्यांनी मी काहीच बोलू शकत नाही. मी कायद्याचा माणूस आहे. मी जनतेचा सेवक आहे, आज पर्यंत मी लोकांची सेवा केली आहे. आणि यापुढेही मी लोकांची सेवाच करणार आहे. असे सांगून समीर वानखेडे यांनी निवडणूक लढवण्यासंदर्भात बोलणे टाळले.