कोरोनाचा नवा स्ट्रेन शोधण्यासाठी सोलापुरातील नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 06:23 PM2021-02-25T18:23:32+5:302021-02-25T18:24:00+5:30
सोलापूर लोकमत बेकींग
सोलापूर: कोरोनाचा नवा स्ट्रेन शोधण्यासाठी जिल्ह्यातील नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे (एनआयव्ही) पाठविण्याचा निर्णय सिव्हील हॉस्पीटलमधील प्रयोग शाळा घेईल अशा सूचना आरोग्य विभागाकडून आल्या आहेत. आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी याबाबत पत्र पाठविल्याचे जिल्हा आराेग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सांगितले.
विर्दभात आफ्रिकेतील विषाणू आढळल्याने अगोदर या विभागातील नमुने तपासणीला पाठवावेत असे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हयातील नमुने केव्हा पाठवायचे याचा निर्णय सिव्हील हॉस्पीटलची प्रयोगशाळा घेणार आहे. जिल्हयात पंढरपूर, माळशिरस तालुक्यात सातत्याने रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे या तालुक्यांमधील पाच नमन्यांची एनआयव्हीमध्ये तपासणी करावी असा जिल्हा आरोग्य विभागाचा आग्रह असणार आहे. वैद्यकीय संशोध विभाग प्रमुखांनी याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन सूचना दिल्या आहेत. त्यानुसार हे नमुने केव्हा तपासणीला पाठवायचे यावर निर्णय होणार आहे.
गेल्या आठवडाभरात अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर तालुक्यात रुग्ण आढळले आहेत. ही संख्या एकदोनवर असली तरी बऱ्याच विश्रांती कालावधीनंतर हे रुग्ण आढळले आहेत. कर्नाटक व इतर जिल्ह्याच्या सीमा भागात नवे रुग्ण दिसून येत आहेत. त्यामुळे या भागात तपासण्या वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांना मास्क व फिजीकल डिस्टन्सचे महत्व पुन्हा एकदा पटवून द्यावे लागणार आहे. यासाठी जनजागृतची मोहीम हाती घेतली जाणार आहे.