चार दरोडे अन् १४ घरफोड्या करणाऱ्या सम्याला कुंभारी पुलाजवळ पकडलं; जिल्ह्यात घातला होता धुमाकूळ
By रवींद्र देशमुख | Updated: December 28, 2023 20:26 IST2023-12-28T20:24:14+5:302023-12-28T20:26:33+5:30
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वळसंग गावात तपासाच्या दृष्टीने फिरत होते. गोपनीय खबऱ्याच्या टीपनुसार सम्या कुंभारी गावात आल्याची माहिती मिळाली.

चार दरोडे अन् १४ घरफोड्या करणाऱ्या सम्याला कुंभारी पुलाजवळ पकडलं; जिल्ह्यात घातला होता धुमाकूळ
सोलापूर : संपूर्ण जिल्ह्यात चार दरोडे, १४ घरफोड्यांद्वारे धुमाकूळ घालणाऱ्या सम्या उर्फ समीर रवी चव्हाण (रा. कुंभारी, ता. द. सोलापूर) याला सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सापळा लावून पकडले. ही कारवाई कुंभारी येथील पुलाजवळ करण्यात आली.
यातील सम्या उर्फ समीर चव्हाण या सराईत गुन्हेगाराने पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा पाच लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. पोलिस त्याच्या मागावर होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वळसंग गावात तपासाच्या दृष्टीने फिरत होते. गोपनीय खबऱ्याच्या टीपनुसार सम्या कुंभारी गावात आल्याची माहिती मिळाली.
सपोनि. शशिकांत शेळके व त्यांच्या पथकाने कुंभारी गावात जाऊन पुलाजवळ सापळा लावला. तो टप्प्यात येताच त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करताना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्याने त्याने आपले खरे नाव, पत्ता सांगितला.
त्याचे पोलिस दप्तरी असलेले रेकाॅर्ड तपासले असता त्याने वैराग, टेंभुर्णी, अकलूज ठाण्यात त्याच्या नावावर चार दरोड्याचे गुन्हे नोंदल्याचे निदर्शनाला आले. तसेच पंढरपूर, करकंब, बार्शी, वैराग, टेंभुर्णी मोहोळ आदी पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध १४ घरफोड्यांची गुन्हे दाखल असून, या गुन्ह्याखाली तो पोलिसांना हवा होता.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलिस निरीक्षक शशिकांत गायकवाड, पोलिस अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, समीर शेख यांनी केली.
वेष अन् नाव बदलून राहत होता
प्रत्येक गुन्ह्याच्यावेळी सम्या उर्फ समीर चव्हाण आपली ओळख इतरांना पटू नये, यासाठी वेष व नाव बदलून राहत होता. पोलिसांना वारंवार चकवा देत होता. अखेर त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुंभारी गाठून जेरबंद केले. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.