अखेर सोलापूर जिल्ह्यातील वाळू लिलावाला लागला मुहूर्त, सोमवारी ऑनलाइन प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 06:28 PM2021-12-24T18:28:08+5:302021-12-24T18:28:11+5:30
सोलापूर : जिल्ह्यातील वाळू लिलावाला अखेर मुहूर्त मिळाला असून, सोमवार, २७ डिसेंबरपासून ऑनलाईन लिलाव प्रक्रिया प्रारंभ होईल. १३ जानेवारी ...
सोलापूर : जिल्ह्यातील वाळू लिलावाला अखेर मुहूर्त मिळाला असून, सोमवार, २७ डिसेंबरपासून ऑनलाईन लिलाव प्रक्रिया प्रारंभ होईल. १३ जानेवारी २०२२ रोजी लिलावांवर ऑनलाईन बोली लागणार आहे. प्रशासनाने नऊ वाळू साठ्यांचा लिलाव काढला असून, दहा डिसेंबर सायंकाळी पाचपर्यंत लिलावात सहभाग घेता येईल. लिलाव पाच वर्षांसाठी असून, यातून साठ ते सत्तर कोटींचा महसूल अपेक्षित आहे. तसेच आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देणे अथवा रद्द करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला असतील, असे जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
जिल्ह्यातील मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्यातील अर्धनारी, बठाण, घोडेश्वर, तामदर्डी, मिरी, तांडोर व सिद्धापूर आदी ठिकाणच्या वाळू साठ्यांसाठी लिलाव नियोजित आहे. पर्यावरण समितीच्या मान्यतेनंतर राज्यातील अन्य ठिकाणची वाळू लिलाव प्रक्रिया सुरू झाली असून, सोलापुरात मात्र विलंब होत होता. महसूल आणि गौण खनिज विभाग यांच्यात समन्वय नसल्यानेच वाळू लिलावाला उशीर होत असल्याचीही चर्चा होती.
गेल्या तीन वर्षांपासून वाळूचे लिलाव झाले नसल्याने बांधकामासाठी वाळू उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे शासकीय योजनेतून बांधण्यात येणारी घरकुले व अन्य बांधकामे तसेच शासनाच्या विविध विभागांची बांधकामे ठप्प आहेत. लिलाव झाले नसल्याने अधिकृतरित्या वाळू उपलब्ध होत नसली, तरी सुरुवातीच्या काळात चोरट्या पध्दतीने काळ्या बाजाराने वाळू मिळत होती. नंतरच्या काळात तीही बंद झाली. याचा विकासकामांवर परिणाम झाला.
१३ जानेवारीपर्यंत प्रस्ताव पाठविणे बंधनकारक...
१० जानेवारीपर्यंत लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीस एकूण रेती गटाची २५ टक्के रक्कम इसारा म्हणून भरणे बंधनकारक राहील. ही रक्कम ११ जानेवारी सायंकाळी ४ पर्यंत जमा करणे अनिवार्य आहे. १३ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचारपर्यंत आलेल्या प्रस्तावांवर अंतिम निर्णय घेण्यात येईल.