वाळू तस्करांची मुजोरी
By admin | Published: July 17, 2014 12:44 AM2014-07-17T00:44:11+5:302014-07-17T00:44:11+5:30
प्रशासन हतबल: कर्मचाऱ्यांना मारहाण; पथकावर दगडफेक
अक्कलकोट: गुड्डेवाडी (ता. अक्कलकोट ) येथील भीमा नदीपात्रात विनापरवाना वाळू तस्करी करणाऱ्यांना रोखण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर २०० जणांनी दगडफेक केली. या पथकास मारहाण करुन पळवून लावले. पोलीस प्रशासनाला कारवाईऐवजी हात हलवत परत जावे लागले. पथकातील कर्मचाऱ्यांना जीव वाचविण्यासाठी स्वसंरक्षणार्थ बंदूक दाखवावी लागली.
कर्नाटकातील इंडी तालुक्यातील बरगुड गावातील तस्कर महाराष्ट्र हद्दीतील अक्कलकोट तालुक्यातील गुड्डेवाडी भीमा नदीपात्रात येऊन वाळू घेऊन जातात. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार चालू आहे. तब्बल ५० वाहनांमधून रोज वाळू चोरी करुन ८० टक्के साठा संपुष्टात आणला आहे.
बुधवारी दुपारी पावणेबारा वाजता अव्वल कारकून संतोषकुमार हिरेमठ, मंगरुळचे तलाठी शिवप्पा कोळी, शेगाव तलाठी व्हनप्पा कोळी, केगावचे तलाठी राहुल गोकुळ, आळगे, कोतवाल अवधूत, शेगाव कोतवाल शिवशरण कोळी, मंगरुळ कोतवाल बंदेनवाज दफेदार, सहायक फौजदार भोई, पो. कॉ. आवताडे, भोसले हे पथक नदीपात्रात जाताच तब्बल दोनशे जणांनी अंगावर धावून येत कारकून हिरेमठ, कोतवाल कोळी व बंदेनवाज या तिघांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन पथकाच्या दिशेने दगडफेक केली.
परिस्थिती लक्षात घेऊन पथक हात हलवत परत आले. याबाबत अज्ञातांविरुद्ध दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिर्याद संतोषकुमार हिरेमठ यांनी दिली आहे.
-------------------------
तलाठ्याच्या बंदुकीमुळे जीव वाचला
महत्त्वाचे पोलीस, महसूल अधिकारी नसताना अशा प्रकारे गाफीलपणाने कमी दर्जाच्या कर्मचाऱ्यांना कारवाईसाठी पाठविणे ही प्रशासनाची बेफिकिरीच आहे. तस्करांचे हिरेमठ हे लक्ष ठरले होते. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास प्रारंभ केला. जीव वाचविण्यासाठी तलाठी शिवप्पा कोळी यांच्याजवळ असणाऱ्या बंदुकीमुळे पथक सुरक्षित परत आल्याची चर्चा सुरू होती.
महसूलच्या पथकावर २०० जणांच्या जमावाकडून दगडफेक
महसूल विभागाच्या पथकासोबत पोलिसाही हतबल
तीघा कर्मचाऱ्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण
तब्बल ५० वाहनांमधून रोज निरंतर होते वाळू चोरी