चपळगावातून चंदन पळविणाऱ्यास पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:16 AM2021-06-11T04:16:17+5:302021-06-11T04:16:17+5:30
अक्कलकोट : चपळगाव (ता. अक्कलकोट) येथील एका शेतक-याच्या बांधावरील चंदनाच्या झाडाची चोरी केल्याप्रकरणी विठ्ठल सिद्धाराम पाटील या संशयित आरोपीस ...
अक्कलकोट : चपळगाव (ता. अक्कलकोट) येथील एका शेतक-याच्या बांधावरील चंदनाच्या झाडाची चोरी केल्याप्रकरणी विठ्ठल सिद्धाराम पाटील या संशयित आरोपीस न्यायदंडाधिकारी नंदा गवळी यांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार संगमेश्वर सिद्धाराम खद्दे यांची चपळगाव येथे ८ एकर जमीन आहे. त्यांच्या शेतात ओढ्यालगत बांधावर अनेक दिवसांपासून चंदनाचे एक झाड वाढले होते. ८ जून रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अनोळखी व्यक्ती या चंदनाच्या झाडाजवळ फिरताना खद्दे यांचा सालगडी रामलाल घनश्याम दुबे यांच्या निदर्शनास आली. दुबे यांनी त्यास हटकले असता त्याने तेथून पळ काढला. दुस-या दिवशी संशयिताने गिरमिट लावून झाडाच्या आतील बाजूचे चंदनाचे गट्टू पळविल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर खद्दे यांनी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्काळ आरोपी विठ्ठल पाटील यास अटक केली. अधिक तपास हवालदार फिरोज मियावाले हे करीत आहेत.
-------