शासन आदेश निघाला; सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी संदीप कारंजे
By Appasaheb.patil | Published: December 14, 2022 02:25 PM2022-12-14T14:25:51+5:302022-12-14T14:26:57+5:30
सध्या नगर अभियंता असलेले संदीप कारंजे हे सोलापूर महापालिकेत सन १९९५ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून सेवेत रुजू झाले.
सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील नगर अभियंता संदीप कारंजे यांची अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय बुधवारी सकाळच्या सत्रात नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरूध्द जेवळीकर यांच्या सहीने प्रसिध्द झाला.
दरम्यान, नगर विकास विभागाच्या निवड समितीने काही दिवसापूर्वी व्हीसीद्वारे नगर अभियंता संदीप कारंजे यांची माहिती जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त मिलिंद शंभरकर यांच्याकडून जाणून घेतली होती. त्यानंतर कारंजे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. दरम्यान, त्यांच्या आदेशाची प्रतीक्षा महापालिका प्रशासनाला लागली होती ती अपेक्षा बुधवारी पूर्ण झाली.
महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच सोलापूर महापालिकेसाठी मंजूर केलेल्या आकृतीबंधानुसार रिक्त असलेल्या स्थानिक अधिकाऱ्यांतून अतिरिक्त आयुक्तपदासाठी माहिती मागविली होती. त्यानुसार महापालिकेकडून एकमेव कारंजे यांची माहिती तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांनी पाठविली होती. त्यानंतर निवड समितीने शिक्कामोर्तंब केल्यानंतर बुधवारी शासन निर्णय जाहीर करण्यात आला.
कोण आहेत संदीप कारंजे?
सध्या नगर अभियंता असलेले संदीप कारंजे हे सोलापूर महापालिकेत सन १९९५ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून सेवेत रुजू झाले. सन २००५ मध्ये ते सहायक अभियंता झाले. तर सन २०१८ मध्ये त्यांच्यावर पदोन्नतीने नगर अभियंता या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. चांगल्या सेवेबद्दल त्यांना यापूर्वी उत्कृष्ट अभियंता पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. आता ते महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत.