श्रावण सोलापुरी; ‘संगमेश्वर’चे विद्यार्थी भक्तगणांसाठी बनले वाढपी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 01:11 PM2019-08-07T13:11:14+5:302019-08-07T13:14:23+5:30
सिद्धरामेश्वर मंदिरातील दासोह विभागात महिनाभर सेवा; श्रावणी सोमवारी ७ हजार भाविकांनी घेतला महाप्रसाद
सोलापूर : श्रावणी सोमवारनिमित्त ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनाने धन्य-धन्य झालेल्या परजिल्हा अन् परप्रांतातील अंदाजे सात हजार भाविकांनी दासोहमधील महाप्रसादाचा आस्वाद घेतला. संगमेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील सुमारे १५० युवक-युवतींनी दासोहमध्ये दोन टप्प्यात आपली सेवा श्री सिद्धरामेश्वर चरणी रुजू केली.
मंदिर परिसरातील योगसमाधीच्या एका दिशेला म्हणजे वीरेश्वर शिवशरण नालतवाड यांच्या मंदिरासमोर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचा कैक वर्षांपासून अन्नदान म्हणजे दासोह विभाग अखंडपणे सुरू आहे. जानेवारी महिन्यातील यात्रा अन् संपूर्ण श्रावण महिन्यात दासोह विभागातील महाप्रसाद घेण्यासाठी परजिल्हा अन् परप्रांतातील भाविकांची मोठी गर्दी असते. दासोहमध्ये महाप्रसाद घेताना आलेल्या भाविकांना अस्सल सोलापुरी भोजनाचा आस्वाद मिळतो.
महाप्रसादाचा आस्वाद घेतल्यावर बहुतांश भाविक आपल्या भावना अथवा प्रतिक्रिया दासोहमधील रजिस्टरमध्ये हमखास नोंदवतात, असे तेथील व्यवस्थापक जगदीश बिराजदार यांनी सांगितले.
श्रावण महिना सुरू झाल्यापासून संगमेश्वर महाविद्यालयातील युवक-युवती प्राचार्या शोभा राजमान्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. ए. व्ही. साखरे यांच्या नेतृत्वाखाली दासोहमध्ये दोन टप्प्यात आपली सेवा बजावत आहेत. श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य आणि दासोह (अन्नछत्र मंडळ) विभागाचे प्रमुख सिद्धेश्वर बमणी यांनी श्रावण महिन्यात दासोह विभागात योग्य नियोजन केले असून, कर्मचारी सुरेश बळुरगी यांच्यासह तेथील वाढपी, सफाई कामगार भाविकांना उत्कृष्ट सेवा देत आहेत.
तरुणाईला मिळाले प्रसादरूपी रुद्राक्ष
- संगमेश्वर महाविद्यालयात शिक्षण घेणाºया युवक-युवतींची सेवा पाहून कर्नाटकातील वीरेश्वर नालतवाड येथून आलेले काही भाविक भारावून गेले. त्यांची सेवा पाहून एका भाविकाने या युवक-युवतींना रुद्राक्ष भेट दिले. श्रुती दर्गोपाटील, अनुराधा कुडतरकर, निकिता पारधे, प्रियंका हलकट्टी, अन्नपूर्णा हिरेमठ, पल्लवी निंबर्गी, प्रेरणा गुरव, वर्षा व्हनमाने, गायत्री भोसले, हृतिक कुर्ले, बिरेश्वर पुजारी, केदार कलशेट्टी, गणेश गवळी, शशिकांत बिराजदार, शुभम नरोळे, अभिषेक लोंढे, प्रवीण म्हमाणे, अक्षर क्षीरसागर, विठ्ठल दामोदरे, शरणय्या हिरेमठ, रविकांत कौंची, वैभवी सोनटक्के आदींनी भेट स्वरूपात मिळालेले रुद्राक्ष साक्षात श्री सिद्धरामेश्वरांचा प्रसाद मिळाला, या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
संगमेश्वर महाविद्यालयातील दीडशे युवक-युवती दासोहमध्ये आपली सेवा बजावत आहेत. शिक्षणाबरोबर वेगळे काहीतरी करण्याची या युवक-युवतींची ऊर्मी पाहण्यासारखी आहे. ‘स्वत:ची कामे स्वत: केली पाहिजेत’, ही भावना त्यांच्यात निर्माण होईल. या युवक-युवतींच्या उपक्रमामुळे दासोहमध्ये आलेल्या भक्तगणांना चांगली सेवा मिळेल.
-धर्मराज काडादी,
अध्यक्ष- श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी.