सांगोला विधानसभा मतदारसंघ; पक्षाने लादलेला उमेदवार आम्हास मान्य नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 12:34 PM2019-10-01T12:34:51+5:302019-10-01T12:36:40+5:30
गणपतराव देशमुख यांनीच निवडणूक लढविण्याची निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी
सांगोला : ज्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, त्यांनी ती परत करावी व आ. गणपतराव देशमुख यांनीच पुन्हा निवडणूक लढवावी़ कार्यकर्ते त्यांना मताधिक्क्याने निवडून देतील, असा निर्धार शेकापच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी सर्वानुमते करण्यात आला. जर त्यांनी उमेदवारी परत नाही केली तर होणाºया दुष्परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही मेळाव्यात कार्यकर्त्यांकडून देण्यात आला. कार्यकर्त्यांनी एवढ्यावरच न थांबता थेट आ. देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन एकदा आम्ही सांगतो म्हणून तुम्हीच उभे राहावे, अशी विनंती करून त्यांनी गळ घातली.
सांगोला विधानसभा मतदारसंघातून आ. गणपतराव देशमुख यांचा राजकीय वारसदार म्हणून भाऊसाहेब रुपनर यांच्या नावाची घोषणा रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शेकापचे राज्य चिटणीस आ. जयंत पाटील व आ. गणपतराव देशमुख यांनी केली़ तेव्हा पक्षाने लादलेला उमेदवार आम्हास मान्य नाही असाही सूर आळवला होता.
दरम्यान, तालुक्यातील पुरोगामी युवक संघटना व आ. गणपतराव देशमुख निष्ठावंत कार्यकर्त्यांनी रविवारीच सोशल मीडियावर संभाव्य उमेदवाराविषयी नाराजी व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी पुन्हा सोमवारी मेळावा घेतला. या मेळाव्यास इच्छुक उमेदवारांपैकी माजी झेडपी सदस्य बाबासाहेब करांडे, अॅड. सचिन देशमुख व चंद्रकांत देशमुख यांच्यासह माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, बाळासाहेब पाटील, शिवाजी बनकर, बाळासाहेब एरंडे, अॅड. मारुती ढाळे, अॅड. धनंजय मेटकरी, अजित गावडे, अनिल शिंदे, चंद्रकांत सरतापे, अंकुश येडगे, दीपक रुपनर, पुरोगामी युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक गोडसे, अशपाक शेख, सर्जेराव वाघ, संजय शिंगाडेसह निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.
दबावतंत्र नसून नेतृत्वावर विश्वास
- निष्ठावंतांचे हे दबावतंत्र नसून विद्यमान नेतृत्व कायम रहावे, यासाठी कार्यकर्त्यांनी मेळावा घेतला आहे. ज्यांना आ. देशमुख यांचा वारसदार म्हणून निवडला आहे ते शेकापचे किती पिढ्यांचे कार्यकर्ते आहेत, असा सवाल उपस्थित करून आबासाहेबांनी कार्यकर्त्यांना वाºयावर सोडायला नको होते. निष्ठा दाखवण्याची हीच वेळ आहे, आबा नसतील तर मतदानाला येणार नाही, वारसदार नेमण्यापेक्षा त्यांनीच निवडणूक लढवावी, अशी एकमुखी मागणी कार्यकर्त्यांनी केली़ केवळ पैशासाठी त्यांना उमेदवारी दिली आहे असा आरोप करीत त्यांनी स्वत: होऊन उमेदवारी परत नाही केली तर निष्ठावंत कार्यकर्ते निवडणुकीत काय करायचे ते ठरवतील. होणाºया दुष्परिणामाला ते स्वत: जबाबदार राहतील, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला़