"गुलाल उधळला नाही तर फाशी घेऊन मरेन"; शहाजीबापूंनी राऊतांना दिलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:35 PM2024-10-23T12:35:53+5:302024-10-23T12:36:35+5:30

शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर सांगोल्याचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊतांना आव्हान दिलं आहे.

Sangola candidate Shahajibapu Patil challenges Sanjay Raut after receiving nomination from Shiv Sena | "गुलाल उधळला नाही तर फाशी घेऊन मरेन"; शहाजीबापूंनी राऊतांना दिलं आव्हान

"गुलाल उधळला नाही तर फाशी घेऊन मरेन"; शहाजीबापूंनी राऊतांना दिलं आव्हान

Shahajibapu Patil On Sanjay Raut: शिवसेना शिंदे गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. सांगोल्यातून शहाजीबापू पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. खेड-शिवापूर टोलनाक्यावर गाडीत पाच कोटी रुपयांची रोकड सापडल्यानंतर शहाजीबापू पाटील यांचे नाव पुढे आले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शहाजीबापू पाटील यांना लक्ष्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र आता शिंदे गटाने उमेदवारी दिल्यानंतर शहाजी बापू पाटील यांनी गुलाल नाय उधळला तर फाशी घेऊन मरेन, असं आव्हान दिलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. शिवसेनेकडून ४० विद्यामान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. सांगोल्यातून पुन्हा एकदा शहाजीबापू पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उमेदवारी मिळाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी निवडणूक जिंकलो नाही तर फाशी घेईन असं आव्हान दिलं आहे. तसेच खासदार संजय राऊत यांनाही शहाजीबापू पाटील यांनी इशारा दिला आहे.

तुम्ही सात-आठ सभा घ्याव्यात. पण मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन, असे आव्हान सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांना दिले आहे. तसेच शहाजी पाटील यांनी पुण्यात सापडलेल्या पैशांवरुन रोहित पवारांवर टीकास्त्र डागलं. "माझ्याविरोधात संजय राऊत, त्याचा बाप, आजा यांनी एक नाही तर दहा सभा घेऊ देत. मी त्याला पालथा पाडून तुडवून पुढे जाऊन दाखवणार. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाही. माझ्यावर टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे काही मुद्दाच नाही. त्यामुळे आज संजय राऊतांना सांगतो, तुम्ही सात-आठ सभा घ्या, मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन," असं शहाजीबापू पाटील म्हणाले.

"मला पैशांबद्दल सांगोल्यात माहिती मिळाली. ते पैसे रफीक नदाक नावाच्या उद्योगपतीचे आहेत. त्यांनी त्या पैशांची जबाबदारी घेतलेली आहे. याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. असल्या गोष्टीचा महाराष्ट्राच्या जनतेवर कोणताही परिणाम होणार नाही. पाठवलेले पैसे पाच कोटी पेक्षा जास्त असल्याचा आरोप करणारे रोहित पवार रफिक भाईंचे पैसे मोजायला गेले होते का? रफिक भाईची श्रीमंती संपूर्ण तालुक्याला माहीत असून त्यांनी हे पैसे आपले असल्याचे सांगितल्याने आता हा विषय संपलेला आहे," असं स्पष्टीकरण शहाजीबापू पाटील यांनी दिलं.
 

Web Title: Sangola candidate Shahajibapu Patil challenges Sanjay Raut after receiving nomination from Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.