सांगोला नगर परिषदेच्या विकासकामांसाठी पाच कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:28 AM2021-08-25T04:28:07+5:302021-08-25T04:28:07+5:30
सांगोला : नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाशेजारील धान्य बाजारातील नवीन व्यापारी संकुलासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून तीन कोटी रुपये ...
सांगोला : नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाशेजारील धान्य बाजारातील नवीन व्यापारी संकुलासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून तीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत, तसेच महात्मा फुले भाजी मंडई येथील बाजार कट्टे, दुकान गाळ्यांसह पहिल्या मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह बांधणे या कामासाठी सुमारे दोन कोटी रुपये, असे एकूण सुमारे पाच कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला माजी आमदार दीपक साळुंखे- पाटील, माजी नगराध्यक्ष प्रा. पी.सी. झपके, शिवसेना नेते भाऊसाहेब रूपनर, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी पाटील, अड उदयबापू घोंगडे, गटनेते सोमनाथ लोखंडे, नगरसेवक सोमेश यावलकर, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, माजी नगरसेवक प्रा. संजय देशमुख, उद्योगपती आनंद घोंगडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील भोरे उपस्थित होते.
आमदार पाटील यांनी राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सांगोला नगर परिषदेच्या शॉपिंग सेंटर व महात्मा जोतिबा फुले भाजी मंडई सुधारणा व पहिल्या मजल्यावर नवीन बहुउद्देशीय सभागृह बांधणेसह विविध कामांसाठी निधी मागितला होता. त्यांच्या मागणीची दखल घेऊन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिला हप्ता म्हणून वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून पाच कोटीचा निधी मंजूर केला.
---
फोटो :२४ सांगोला १
सांगोल्यातील विविध कामांसाठी निधी मंजूर झाल्याची शहाजी बापू पाटील यांच्या आयोजित पत्रकार परिषदेला माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, प्रा. पी.सी. झपके, भाऊसाहेब रूपनर, तानाजी पाटील, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ आदी मान्यवर.