सांगोला पंचायत समिती करणार चार हजार वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:16 AM2021-06-26T04:16:45+5:302021-06-26T04:16:45+5:30
एक पद, एक वृक्ष या अभियानाचा प्रारंभ सभापती राणी कोळवले यांनी सांगोला पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण करून केला. मुख्य ...
एक पद, एक वृक्ष या अभियानाचा प्रारंभ सभापती राणी कोळवले यांनी सांगोला पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण करून केला. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून २४ ते ३० जून या कालावधीत पंचायत समिती परिसरात ३७०, प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगी परिसरात २००, तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या परिसरात ३४३० अशी चार हजार झाडे लावली जाणार आहेत.
या अभियानांतर्गत जिल्हा परिषद खात्यांतर्गत सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, सेविकेसह कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संख्येप्रमाणे प्रत्येकी एक याप्रमाणे कार्यालय परिसरात वृक्षारोपण करणार आहेत. वृक्षारोपण केल्यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्या वृक्षाचे संगोपन करण्यासाठी अभिलेख तयार करावयाचा आहे. वृक्षारोपणासाठी लागणारी खते व कीटकनाशके, आदी साहित्य संबंधित कर्मचाऱ्याने उपलब्ध करावयाचे आहे. पुढील वर्षी पुन्हा नव्याने वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केले जाईल, असा हा उपक्रम असल्याचे गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी सांगितले.
याप्रसंगी कृषी विकास अधिकारी विकास काळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी सीमा दोडमनी, प्रभारी गटशिक्षण अधिकारी प्रदीप करडे, कृषी अधिकारी दीपाली शेंडे, पं. स. सदस्य नारायण जगताप, विस्तार अधिकारी एम. डी. स्वामी, बी. एस. फुले, नागटिळक, प्रशासन अधिकारी आयुब बागवान, आदी उपस्थित होते.