सांगोला पोलिसांची मोठी कामगिरी; खुनातील दोन महिलांसह पाच आरोपी ४८ तासात अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 10:19 PM2021-11-02T22:19:58+5:302021-11-02T22:20:25+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सांगोला: अखेर सांगोला पोलिसांनी सांगोल्यातील खुनाचा गुन्हा ४८ तासांच्या आत उघडकीस आणून गुन्हातील दोन महिलांसह पाच जणांना अटक करुन कोठडीत रवानगी केली.
अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पतीचा अपघात झाल्याचा बनाव करून पत्नी प्रियकरासह पाच जणांनी मिळून आपसात कट रचून हत्याराने वार करून सांगोल्यातील तुकाराम सोपान माने (५५) याच्या खुनाचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या ४८ तासात उघडकीस आणला. या प्रकरणी मृताची पत्नी प्रियकरासह पाच जणांना अटक करून खुनाचा छडा लावल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पोलिसांनी या गुन्ह्यात सचिन हनुमंत लवटे, प्रदीप ऊर्फ बंटी विलास कांबळे व सचिन तुकाराम घोडके तिघेही (रा. महुद) , मृताची पत्नी राजाबाई तुकाराम माने (रा. मणेरीमळा, सांगोला) व रेश्मा उर्फ सविता शिवाजी शेंडगे (रा. शिवणे ता. सांगोला) यांना काल मंगळवारी अटक केली. तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्या. देशमुख यांनी ५ जणांना रविवार ७ नोव्हेंबरपर्यंत ६ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर , पोलीस निरीक्षक हेमंत काटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी राजूलवार, महिला पोलीस उपनिरीक्षका सोनम जगताप, सहाय्यक फौजदार लिंबाजी पवार पोलीस नाईक बाबासाहेब पाटील ,राहुल देवकते, गणेश मेटकरी, सुनील मोरे ,राहुल कोरे संभाजी भोसले, पोलीस कॉन्स्टेबल धुळा चोरमले, दाते, महिला पोलीस कर्मचारी छाया चौगुले, सायबर सेलचे पोलीस नाईक अन्वर आतार यांनी केली.