सांगोला रेल्वे स्थानक बनले देशातील लोडिंग हब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:09 AM2021-01-08T05:09:57+5:302021-01-08T05:09:57+5:30
सध्या देशात सांगोला-मुझफ्फरपूर, सांगोला-आदर्शनगर (दिल्ली), सांगोला-शालिमार (कोलकाता), सांगोला-हावडा, बंगळुरू-सांगोला-आदर्शनगर, देवळाली-दानापूर, अनंतपूर-आदर्शनगर, यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन, नागपूर-आदर्शनगर, छिंदवाडा-हावडा, इंदोर-गुवाहाटी, रतलाम-गुवाहाटी, इंदौर-आगरतळा या ...
सध्या देशात सांगोला-मुझफ्फरपूर, सांगोला-आदर्शनगर (दिल्ली), सांगोला-शालिमार (कोलकाता), सांगोला-हावडा, बंगळुरू-सांगोला-आदर्शनगर, देवळाली-दानापूर, अनंतपूर-आदर्शनगर, यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन, नागपूर-आदर्शनगर, छिंदवाडा-हावडा, इंदोर-गुवाहाटी, रतलाम-गुवाहाटी, इंदौर-आगरतळा या मार्गांवर किसान रेल्वे धावत आहेत. यापैकी पाच किसान रेल्वे सांगोला स्थानकातून धावत आहेत.
किसान रेल्वेला छाेट्या स्थानकांवर थांबे असल्याने छाेट्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून चांगला नफा मिळवता येत आहे. कमी खर्च, सुरक्षित आणि त्वरित पुरवठा यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान बदलत आहे. किसान रेल्वेमुळे आता छाेट्या रेल्वे स्थानकांचे शेती उत्पादनांच्या माेठ्या लाेडिंग हबमध्येही रूपांतर हाेत आहे.
सांगाेला, बेलवंडी, काेपरगाव, बेलापूर आणि माेडनिंब अशा माल किंवा पार्सल वाहतूक नसलेल्या स्थानकांवर किसान रेल्वेला थांबे देण्यात आले आहेत. या भागातील छाेट्या शेतकऱ्यांचा विचार करता या स्थानकांवरील थांब्यांमुळे डाळिंब, पेरू, सीताफळ, केळी आणि इतर फळे, भाजीपाला आणि मासे देशात विविध ठिकाणी पाठवले जात आहेत.
९० हजार क्विंटल शेतमाल, फळांची वाहतूक
छाेट्या स्थानकांचा कल्पकतेने रेल्वेने वापर सुरू केल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या नफ्यातही वाढ हाेताना दिसते आहे.
सांगाेला हे लहान रेल्वे स्थानक आहे; मात्र सध्या ते पाच किसान रेल्वेचे माेठे लाेडिंग पाॅइंट बनले आहे. किसान रेल्वे सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण ९० हजार क्विंटल शेतीमाल व फळांची वाहतूक तेथून झाली आहे.
५.५ कोटींचे रेल्वेला मिळाले उत्पन्न
देशात सांगोला रेल्वे स्थानकातून धावलेल्या सर्वाधिक किसान रेल्वेच्या ९२ फेऱ्यांच्या माध्यमातून तब्बल १ लाख ८ हजार ७२ क्विंटल डाळिंब, केळी, द्राक्षे, सिमला मिरची, लिंबू यांसह इतर शेतीमाल व फळांच्या वाहतुकीतून रेल्वेला ५ कोटी ५ लाख ६८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर १ कोटी ५७ लाख ९ हजार रुपयांची सबसिडी रेल्वेकडून शेतकऱ्यांना मिळाली आहे.