सांगोला शहर गूढ आवाजाने हादरले, नागरिक भयभीत, एकमेकांकडे चौकशी सुरू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 01:53 PM2018-01-16T13:53:34+5:302018-01-16T13:58:19+5:30
अचानक धुडूंब... असा मोठा गूढ आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला. जो तो घराच्या बाहेर रस्त्यावर येऊन आवाज कशाचा झाला, कोठे भूकंप की विमान पडले की भूगर्भातून आवाज आला असे वेगवेगळे अर्थ लावून चर्चा करू लागले.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सांगोला दि १६ : शहर व तालुका गूढ आवाजामुळे हादरून गेला. हा आवाज इतका मोठा होता की, आवाजामुळे सिमेंट, धाब्याच्या, पत्राच्या घरांतील संसारोपयोगी साहित्य, दारे, खिडक्यांच्या काचा हादरल्यामुळे जो तो घराच्या बाहेर येऊन कशाचा आवाजा झाला, याविषयी घाबरलेल्या अवस्थेत एकमेकांकडे चौकशी करू लागला.
दु. ३ वाजून ११ मि. अचानक धुडूंब... असा मोठा गूढ आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला. जो तो घराच्या बाहेर रस्त्यावर येऊन आवाज कशाचा झाला, कोठे भूकंप की विमान पडले की भूगर्भातून आवाज आला असे वेगवेगळे अर्थ लावून चर्चा करू लागले.
शहरातील लोक ग्रामीण भागात तर ग्रामीण भागातील लोक शहरातील मित्रपरिवार, नातेवाईकांना मोबाईलवरून संपर्क साधत आवाज कशाचा झाला, कोठून झाला, अशी चौकशी करू लागले. आवाजाच्या तीव्रतेमुळे सिमेंट व पत्र्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य, दारे, खिडक्या, काचा, रस्त्यावरील वाहने, कार्यालयातील साहित्य हादरून गेले. आवाजाच्या तीव्रतेमुळे शहर व तालुक्यात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे समजते.
नेमका आवाज कशाचा झाला, कोठून आला या निकषापर्यंत कोणालाही पोहोचता आले नाही. आवाजाविषयी प्रशासनाकडे चौकशी केली असता नेहमीप्रमाणे कानावर हात ठेवून काय आवाज झाला का? आम्हाला माहीत नाही, माहिती घेऊन सांगतो , अशी समर्पक उत्तरे देऊन हात झटकले.
-----------------
सांगोल्यात गूढ आवाज झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र आवाजामुळे कोणतीही वित्त अगर जीवितहानी झाली नाही. या आवाजासंदर्भात मंडलाधिकारी, गावकामगार तलाठी यांना चौकशी करण्यास सांगितले असून, मीही या आवाजाविषयी माहिती घेत आहे.
- संजय पाटील
तहसीलदार