सांगोलेवासीयांनी काढली रणजितसिंह नाईक-निंबाळकर उंटावरून मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 08:19 PM2019-06-14T20:19:01+5:302019-06-14T20:22:22+5:30
बारा वर्षांचे काम अवघ्या बारा दिवसात ; बारामतीचे पाणी बंद केल्याने आनंद
सांगोला : बारा वर्षांचे काम अवघ्या बारा दिवसात आणि तेही बारा तारखेला करून खासदारांनी सांगोल्याच्या जनतेला दिलेला शब्द पाळला. या आनंदाच्या भरात त्यांची मिरवणूक उंटावरुन काढून सांगोलेकरांनी गुरुवारी जल्लोष केला. सांगोल्यात एखाद्या नेत्याची उंटावरुन मिरवणूक काढण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असल्याने या मिरवणुकीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.
नीरा-देवधरमधून नियमबाह्य जाणारे ६० टक्के पाणी बंद करून ते खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या ५ तालुक्यांकडे वळविले. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी शहरातील महात्मा फुले चौकात खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
महात्मा फुले चौक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना उंटावर बसण्याचा आग्रह केला; मात्र त्यांनी उंटावरुन मिरवणूक काढण्यासाठी विरोध केला, परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पाच पाऊले उंटावर बसून त्यांनी कार्यकर्त्यांचा मान ठेवला. त्यानंतर उंटावरुन खाली उतरुन ते पायी चालत नियोजित सत्काराच्या ठिकाणी पोहोचले.
नियोजन होते हत्तीचे...
- पाणी मिळाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी गुरुवारी त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढण्याचा विचार केला होता, परंतु हत्तीला परवानगी मिळणार नाही, हे गृहित धरुन त्यांनी सांगोल्यात व्यवसायानिमित्त आलेल्या उंटाची निवड करून त्यावरुन त्यांची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला.