सांगोल्यात शेकाप,भाजपा स्वबळावर लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:36 AM2020-12-13T04:36:38+5:302020-12-13T04:36:38+5:30

सांगोला : तालुक्यातील मुदत संपलेल्या ६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यादृष्टीने विविध राजकीय पक्षांच्या गावपुढाऱ्यांनी मोर्चेबांधणीस सुरुवात ...

In Sangolya, BJP will fight on its own | सांगोल्यात शेकाप,भाजपा स्वबळावर लढणार

सांगोल्यात शेकाप,भाजपा स्वबळावर लढणार

Next

सांगोला : तालुक्यातील मुदत संपलेल्या ६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यादृष्टीने विविध राजकीय पक्षांच्या गावपुढाऱ्यांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केल्याने सरपंच व सदस्यपदासाठी इच्छुकांची मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस (आय), रिपाइं (कवाडे गट), राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एकत्रित येऊन, तर शेकाप व भाजप स्वबळावर लढणार आहेत. तालुक्यातील सहकारी संस्था व काही ग्रामपंचायतवगळता बहुतांश ग्रामपंचायतींवर शेकाप-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टींत अंतर पडले आहे. त्यामुळे शेकापने सध्या एकला चलोची भूमिका घेतली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आ. शहाजीबापू पाटील आणि दीपक साळुंखे-पाटील एकमेकांच्या जवळ आले असून, त्यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबर रोजी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे तालुक्यातील मुदत संपलेल्या ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. शहाजीबापू पाटील आणि दीपक साळुंखे-पाटील व काँग्रेसचे प्रा.पी. सी. झपके हे तिघेजण मिळून ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढविणार आहेत. शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख हे स्वबळावर लढणार की कोणाची मदत घेणार हे गुलदस्त्यातच आहे.

सरपंच व सदस्यपदासाठी बुधवारी २३ ते बुधवार ३० डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल केले जाणार आहेत. अर्जाची छाननी ३१ डिसेंबर रोजी होणार आहे. ४ जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेतले जातील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हवाटप व उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहेत. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सांय.५.३० पर्यंत मतदान होणार आहे. १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

---

तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीच्या निवडणूका शिवसेना, राष्ट्रवादी काॅग्रेस, काॅग्रेस (आय), राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट) यांच्याशी युती करून लढविणार आहोत.यंदाच्या ग्रामपंचायतीच्या निकालाचे चित्र बदललेले असेल

- शहाजीबापू पाटील

आमदार

--

शेकापकडून ६१ ग्रामपंचायतीच्या निवडणूका स्वबळावर लढविण्यासाठी प्रयत्न आहे. असे असलेतरी त्या त्या गावातील पक्षाच्या पदाधिका-यांना परिस्थितीनुसार युतीचे अधिकार दिले आहेत.

- भाई विठ्ठलराव शिंदे

चिटणीस, शेकाप

--

भाजप ६१ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत संपूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. कोणासोबत युती करायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेणार आहोत.

-चेतनसिंह केदार

तालुकाध्यक्ष, भाजप

---

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी हाच पॅटर्न असणार आहे. इतर समविचारी पक्षांनाही सोबत घेणार आहोत.

- दीपक साळुंखे-पाटील

माजी आमदार

Web Title: In Sangolya, BJP will fight on its own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.