स्वच्छता सोलापुरी; राज्यात यंदा पंधराव्या क्रमांकावरी, गतवर्षीपेक्षा चांगली कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:54 PM2019-03-07T12:54:56+5:302019-03-07T12:56:39+5:30
सोलापूर : स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ मध्ये सोलापूर महापालिकेने देशात ५४ वा क्रमांक पटकाविला आहे तर महाराष्ट्रात १५ वा ...
सोलापूर : स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ मध्ये सोलापूर महापालिकेने देशात ५४ वा क्रमांक पटकाविला आहे तर महाराष्ट्रात १५ वा क्रमांक पटकाविला आहे. गेल्या दोन वर्षांतील ही सुधारित कामगिरी असल्याचे मनपा उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी सांगितले.
ढेंगळे-पाटील म्हणाले, स्वच्छ भारत सर्वेक्षणात देशातील ४ हजार शहरांनी सहभाग नोंदविला होता. स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१७ मध्ये सोलापूर महापालिका ११५ व्या स्थानी होती तर २०१८ मध्ये ८६ व्या स्थानी होती. २०१९ च्या सर्वेक्षणात सहभाग नोंदविताना घनकचरा व्यवस्थापनाने शहर कचरा कोंडाळेमुक्त केले. बाजारपेठेच्या ठिकाणी ओला आणि सुका कचरा संकलित करण्यासाठी लिटरबीन्स लावण्यात आले. महापालिकेच्या वतीने भोगाव येथील कचरा डेपोच्या जागेवर बायोएनर्जी प्रकल्प राबविला जातो. त्याचेही जादा गुण मिळाले आहेत.
स्मार्ट सिटी योजनेतून १२० घंटागाड्या घेण्यात आल्या. त्यांना रुट मॅपिंग करण्यात आले. गाड्यांना जीपीएस सिस्टिम लावण्यात आली. घंटागाड्या घरोघरी जाऊन ओला आणि सुका कचरा संकलित करीत आहेत. प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर महाराष्ट्रातील पहिली दंडाची पावती सोलापुरात करण्यात आली. सर्वेक्षण करणाºया समितीने शहरातील सामुदायिक शौचालये फाईव्ह स्टार रेटिंगचे असावेत, असा दंडक घातला आहे. आपण शौचालयांची दुरुस्ती केली आहे. सर्वच ठिकाणे आरसे, दिव्यांगांसाठी रॅम्प लावले आहेत.
पुढील वर्षी पहिल्या दहामध्ये येऊ : ढेंगळे-पाटील
- डिजिटल सर्वेक्षणात नागरिकांच्या सूचना आणि प्रतिसादही महत्त्वाचा आहे. सफाई कर्मचारी आणि अधिकाºयांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे हे शक्य झाले आहे. यावर्षी पुन्हा चांगली कामगिरी होईल. घंटागाड्यातील कचरा संकलित करण्यासाठी आणखी दोन कचरा स्टेशन लवकरच सुरू होणार आहे. पुढील वर्षी देशात पहिल्या १० मध्ये येण्यासाठी प्रयत्न करु.
शहर आता पूर्वीपेक्षा चांगले दिसायला लागले आहे. सर्वसामान्य सफाई कर्मचारी बºयाच ठिकाणी अहोरात्र काम करीत आहेत. मोदी सरकारकडून घनकचरा व्यवस्थापन विभागाला चांगला निधी मिळाला आहे. स्मार्ट सिटी योजनेतून घेतलेल्या घंटागाड्यांमुळे चांगली मदत झाली आहे. यामुळेच स्वच्छ भारत अभियानात मनपाची कामगिरी मागच्या तुलनेत चांगली झाली आहे. पुढील वर्षी पहिल्या दहा क्रमांकात येण्यासाठी प्रशासनाला आमचे सहकार्य राहील.- संजय कोळी, सभागृह नेते
आम्ही सत्तेवर आलो तेव्हा घंटागाड्याचे खासगीकरण झाले होते. आमच्यातील काही लोकांचा विरोध असतानाही हे खासगीकरण रद्द केले. त्यातून महापालिकेचे ५८ कोटी रुपये वाचले. मनपा प्रशासनाकडून घंटागाड्याचे काम सुरू झाले. शहरातील नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता घंटागाड्यांमध्ये टाकायला सुरुवात केली. व्यापाºयांनीही शिस्त लावून घेतली. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाºयांची, सफाई कर्मचाºयांनी चांगले काम केले. त्यामुळे या अभियानात चांगली कामगिरी झाली आहे.
- शोभा बनशेट्टी, महापौर