जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांनी बंद केली सॅनिटायझर निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:22 AM2021-04-25T04:22:17+5:302021-04-25T04:22:17+5:30
गतवर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर बाजारात सॅनिटायझर उपलब्ध होत नव्हते, ज्या कंपन्या पूर्वीपासून वैद्यकीय उपयोगांसाठी सॅनिटायझर बनवत होत्या, त्यांच्या ...
गतवर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर बाजारात सॅनिटायझर उपलब्ध होत नव्हते, ज्या कंपन्या पूर्वीपासून वैद्यकीय उपयोगांसाठी सॅनिटायझर बनवत होत्या, त्यांच्या उत्पादनावर मर्यादा पडल्या. परिणामी, सॅनिटायझरचे दर कैकपटीने वाढले. अशा स्थितीत साखर कारखान्यांना सॅनिटायझर निर्मितीसाठी उत्पादन शुल्क खात्याकडून परवाने देण्यात आले. खासगी डिस्टिलरीजना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या उत्पादन क्षमतेला वाढीसाठी मान्यता देण्यात आली.
सुरुवातीच्या काळात सॅनिटायझरला मोठी मागणी होती. साखर कारखान्यांनी त्यांच्याकडील इथेनॉलचा वापर करून निर्मिती सुरू केली.
शासनाने या कारखान्यांना खरेदीची हमी दिली नसली, तरी बाजारात चांगला दर मिळाला. प्रतिलीटर २०० रुपये कमाल दराने विक्री होत राहिली. मात्र, मागणीचा ओघ वाढल्याने गुजरात आणि अन्य राज्यांतील घरगुती उत्पादकांनी बाजारात आणले. दुय्यम दर्जाच्या उत्पादनांना ग्राहकांची पसंती मिळाल्याने दर घसरले.
मध्यंतरी १०० रुपये प्रतिलीटर दर होता, आता तर पाच लीटरचा कॅन अवघ्या २५० रुपयांना मिळतो. उत्पादन खर्च निघत नसल्याने निर्मिती बंद करावी लागली. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी तर संपूर्ण बाजारपेठ काबीज केली. नामवंत कंपन्यांच्या उत्पादनाला ग्राहकांची पसंती वाढली.
-------
या कारखान्यांनी केले उत्पादन
विठ्ठलराव शिंदे कारखाना गंगामाईनगर (३२ हजार लीटर), लोकमंगल ॲग्रो इंडस्ट्रिज बीबीदारफळ (१ लाख ५३ हजार लीटर), श्री पांडुरंग कारखाना श्रीपूर (६३ हजार लीटर), विठ्ठल कार्पोरेशन म्हैसगाव (६५ हजार ८०८ लीटर), फॅबटेक शुगर्स मंगळवेढा (२८ हजार ७७७ लीटर), जकराया शुगर्स वटवटे (५ लाख २६ हजार लीटर), युटोपियन शुगर्स मंगळवेढा (६४ हजार ५१८ लीटर), श्री सिद्धेश्वर कारखाना कुमठे (१ लाख ९ हजार लीटर), दि सासवड माळी शुगर्स माळीनगर ( १३ हजार ३४२ लीटर).
----
सॅनिटायझर निर्मितीही गरज होती. त्यामुळे आम्ही उत्पादनाचा निर्णय घेतला. आता अनेक कंपन्या यात उतरल्याने दर उतरले आहेत. तरीही या वर्षी पुन्हा उत्पादनासाठी आम्ही परवाना मागितला आहे.
- सचिन जाधव, कार्यकारी संचालक, जकराया शुगर्स वटवटे, मोहोळ
------