संजय देशमुखसह सहा जणांचा जामीन फेटाळला
By admin | Published: May 7, 2014 08:35 PM2014-05-07T20:35:31+5:302014-05-07T22:51:10+5:30
सोलापूर :मोटरसायकलीस धडक मारल्यावरून अशोक भडकवाड यांना मारहाण करून एक हजाराची लूट
सोलापूर :
मोटरसायकलीस धडक मारल्यावरून अशोक भडकवाड यांना मारहाण करून एक हजाराची लूट व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणात मोहोळ तालुका शिवसेनाप्रमुख संजय देशमुख यांच्यासह सहा जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. अग्रवाल यांनी फेटाळून लावला.
अशोक भडकवाड हे ४ ऑगस्ट २००१ रोजी भावाबरोबर मोहोळ बसस्थानकाकडे जात असताना महेश देशमुख, रणजित गायकवाड यांच्या मोटरसायकलीची धडक लागली. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. याचा राग मनात धरून दुसर्या दिवशी अशोक हे कामावरून गावाकडे जात असताना आरोपींनी त्यांना अनगर फाट्याजवळ अडवून शिवीगाळ केली. संजय याने कानफटावलं तर रणजित याने गच्ची पकडली. शिवाजी व महेश देशमुख यांनी लाथाबुक्क्याने, हॉकी स्टिकने, विक्रांत देशमुख याने साखळीने मारहाण केली. संजय याने खिशातील एक हजाराची रोकड पळविली. याबाबत मोहोळ पोलिसांनी तक्रार घेतली नाही. त्यानंतर आरोपी जमावासह पोलीस ठाण्यात आले व तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. याला घाबरून त्यांनी तक्रार नसल्याचा जबाब दिला. त्यानंतर गृहमंत्र्यांकडे तक्रार केली. पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलाविले पण फौजदार धुमाळ हजर राहिलेच नाहीत. अधीक्षकांकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याने भडकवाड यांनी न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली.
न्यायालयाने संजय देशमुख, रणजित गायकवाड, महेश देशमुख, विक्रांत देशमुख, अजय देशमुख, साईनाथ गायकवाड व फौजदार धुमाळ यांच्याविरूद्ध मारहाण करून लूट व ॲट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल करून मोहोळ पोलिसांना अहवाल देण्याचे आदेश दिले. या प्रकरणात अटक होईल या भीतीपोटी सहा आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे, मूळ फिर्यादीतर्फे ॲड. महेश जगताप तर आरोपींतर्फे ॲड. राज पाटील यांनी काम पाहिले.