Lok Sabha Election 2019; संजयमामांचा भाजपला नकार; पुन्हा रणजितदादांचा विचार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:36 PM2019-03-14T12:36:30+5:302019-03-14T12:42:48+5:30
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे यांनी मुख्यमंत्र्यासमोर स्पष्टपणे नकार दिल्यानंतर भाजपकडून पुन्हा ...
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे यांनी मुख्यमंत्र्यासमोर स्पष्टपणे नकार दिल्यानंतर भाजपकडून पुन्हा एकदा माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाचा विचार सुरू झाला आहे.
माढा लोकसभेतील उमेदवारीबाबत भाजपामध्ये खलबते सुरूच आहेत. झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या भेटीत त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा विचार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. पण मोहिते-पाटील भाजपामध्ये आल्यास तुमची भूमिका काय असेल या प्रश्नावर त्यांनी दोन दिवसांत महाआघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय कळवितो असे सांगितले. महाआघाडीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक होणार आहे.
मोहिते-पाटील भाजपकडून उभारल्यास तटस्थ राहणार : शिंदे
- - वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संजय शिंदे यांना म्हणाले, ‘माढ्यात भाजपाने सर्वप्रथम तुम्हाला प्राधान्य दिले आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनीही भाजपाची उमेदवारी घेण्याची तयारी दर्शविली आहे. तुम्ही काय करणार सांगा.’ त्यावर संजयमामा म्हणाले, ‘मला लोकसभेत नाही तर करमाळा विधानसभा मतदारसंघात रस आहे.’
- - ‘मग आम्ही रणजितसिंहांना उमेदवारी दिली तर तुम्ही काय करणार,’ असे मुख्यमंत्र्यांनी विचारले असता संजयमामा म्हणाले,‘मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. मला आमदार प्रशांत परिचारक, उत्तमराव जानकर, राजेंद्र राऊत, जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करावी लागेल. सर्वांशी चर्चा करून निर्णय कळवितो. हवे तर मी तटस्थ राहीन. मी राष्ट्रवादीला किंवा मोहिते-पाटलांना मदत करणार नाही.’