सोलापुरच्या संकल्प युथ फौउंडेशनने ‘एचआयव्ही’बाधितांना मिळवून दिले जीवनाचे जोडीदार
By Appasaheb.patil | Published: December 1, 2018 11:52 AM2018-12-01T11:52:00+5:302018-12-01T11:54:06+5:30
संकल्प युथ फाउंडेशनचे कार्य : ‘एचआयव्ही’ग्रस्तांना सन्मान देणारी अजोड विधायकता
आप्पासाहेब पाटील/ मिलिंद राऊळ
सोलापूर : एचआयव्ही बाधितांना सन्मानाने जगता यावे, एचआयव्ही म्हणजे शेवट नव्हे; एकमेकांच्या साथीने सामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगता आले पाहिजे, यासाठी सोलापुरातील संकल्प युथ फाउंडेशनच्या किरण लोंढे यांनी वधू - वर मेळावे, बाधित मुलांना दत्तक घेण्यासह आजपर्यंत विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
एचआयव्ही बाधितांसाठी जनजागृती होत असली तरी समाजाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला नाही. लहान वयातच जर एचआयव्हीची लागण झाली असेल, तर त्यांना एकट्यानेच आयुष्य कंठणे क्रमप्राप्त होते. यामुळेच वधू-वर मेळावा, दत्तक मुले, महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी घेतलेला पुढाकार संकल्प युथ फाउंडेशन या संस्थेमुळे एड्सबाधितांना आधार प्राप्त झाला आहे. याबाबत बोलताना किरण लोंढे म्हणाले की, वंचित व एचआयव्ही बाधितांसाठी २०१५ साली संकल्प युथ फाउंडेशनची स्थापना केली. ओंकार साठे, सूरज भोसले, पूजा काटकर, श्रद्धा राऊळ, आकाश धोत्रे, नितेश फुलारी, विजय वाघमोडे आदींच्या सहकार्याने या संस्थेने आजपर्यंत विविध एचआयव्ही बाधितांसाठी विविध उपक्रम हाती घेऊन विधायक काम हाती घेतले़ सुरुवातीला बाधितांसाठी काम करताना अनेक अडचणी आल्या़ त्यानुसार समाजाचा दृष्टिकोन बदलू लागला तशी संस्थेला मदत करणाºयांची संख्या देखील वाढू लागली़ आज संस्थेच्या या सुरू असलेल्या कामाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात असल्याचेही लोंढे यांनी सांगितले.
वधू-वर मेळाव्याला प्रतिसाद
संकल्प युथ फाउंडेशनच्या वतीने १४ फेबु्रवारी २०१८ रोजी एचआयव्ही बाधितांसाठी वधू-वर मेळाव्याचे आयोजन केले होते़ या मेळाव्यात ३० वर्षांखालील १६८ वधू-वर सहभागी झाले होते़ यात महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडू आदी राज्यांतील लोक सहभागी झाले होते़ या मेळाव्यात ६ विवाह जमविण्यात आले होत्े. त्यापैकी ३ वधू-वरांचा विवाह संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून झाला आहे़ उर्वरित वधू-वरांचा विवाह लवकरच होणार आहे़
५० एचआयव्ही संसर्गित मुले घेतली दत्तक
मागील ३ वर्षांपासून संकल्प युथ फाउंडेशनच्या वतीने सोलापूर शहर व परिसरातील ५० एचआयव्ही बाधित मुले दत्तक घेतली आहेत. या मुलांना रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी लागणारा आहार शिक्षणाचा खर्च, आरोग्याची संपूर्ण काळजी नियमित घेण्यात येत आहे़ दत्तक घेताना मुलांमधील रोगप्रतिकारशक्ती २५० सीडीएफ कॉउंट अशी होती, ती आता १५०० झाली आहे़ नियमित न्युट्रेशन दिल्यामुळे या विद्यार्थ्यांमधील प्रतिकारशक्ती वाढीस लागल्याची माहिती किरण लोंढे यांनी दिली.
महिला पुनर्वसनासाठी घेतला पुढाकार
शहर व जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गित महिला पुनर्वसनाचा वसा संकल्प युथ फाउंडेशनने घेतला. त्यानंतर ३० महिलांसाठी स्वयंपूर्ण बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या महिलांना प्रशिक्षण, कार्यशाळा, रांगोळी, मेंदी, शिवणकाम आदी व्यवसाय मिळवून देऊन आर्थिक बाजूने स्वयंपूर्ण बनविण्यासाठी अहोरात्र कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे़
संकल्प युथ फाउंडेशनच्या माध्यमातून एचआयव्ही बाधित युवक, युवती, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी कार्य करीत आहे़ या मुलांना नैराश्य येऊ नये, यासाठी मुख्य काळजी घेतली जाते़ वंचितांबरोबर एचआयव्ही बाधित लोकांसाठीयापुढेही कार्य असेच सुरू राहणार आहे़
- किरण लोंढे, संकल्प युथ फाउंडेशन, सोलापूर.