संत ज्ञानेश्वर माउलींकडून लाडक्या बहिणीस साडीचोळीचा आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:15 AM2021-07-24T04:15:28+5:302021-07-24T04:15:28+5:30
आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी संत निवृत्तिनाथ, संत सोपानदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताई अशी चारही भावंडे पंढरपुरात येतात. पंढरपुरात एकादशीच्या ...
आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी संत निवृत्तिनाथ, संत सोपानदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताई अशी चारही भावंडे पंढरपुरात येतात. पंढरपुरात एकादशीच्या पूर्वसंध्येला वाखरी येथे या चारही भावंडांची भेट होते. यानंतर गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपल्या लाडक्या बहिणीस भेट म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांकडून संत मुक्ताई यांना साडीचोळीचा आहेर दिला जातो.
यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांच्याकडून संत मुक्ताई यांच्या पादुकांना विधिवत अभिषेक घातला जातो. यानंतर मानाची साडीचोळी संत मुक्ताबाई यांच्या पादुकांवर ठेवली जाते. एक प्रकारे भाऊबीजेची भेट संत ज्ञानेश्वर माउली यांच्याकडून मुक्ताबाईला दिली जाते. आळंदी संस्थानच्या वतीने विश्वस्त योगेश देसाई यांनी संत मुक्ताईच्या पादुकांची विधिवत पूजा करून साडीचोळी अर्पण केली, तर संत मुक्ताई संस्थानच्या वतीने विश्वस्त भय्यासाहेब पाटील यांच्याकडून आळंदी संस्थांच्या विश्वस्तांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
भाऊबीजेला मुक्ताईंच्या मूर्तीस परिधान केली जाते साडीचोळी
आषाढीच्या सोहळ्यात माउलींकडून मुक्ताईंना आलेला साडीचोळीचा आहेर, मुक्ताई संस्थान दिवाळीपर्यंत सुरक्षित ठेवते. आणि दिवाळीतील भाऊबीजेच्या दिवशी माउलींकडून आलेला आहेर मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथील मंदिरामध्ये मुक्ताई यांच्या मूर्तीस परिधान केला जातो.
----