संत काशीबा युवा विकास योजना सुरू करणार; ५० कोटींचीही केली तरतूद
By Appasaheb.patil | Published: December 12, 2022 12:42 PM2022-12-12T12:42:03+5:302022-12-12T12:47:48+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदें ची घोषणा
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : राज्यातील गुरव समाजाच्या विकासासाठी संत काशीबा युवा विकास योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापुरात केली. दरम्यान, या नव्या योजनेसाठी ५० कोटींचीही तरतूद करण्यात आल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय गुरव समाज महासंघ आयोजित गुरव समाजाचे महाअधिवेशन सोलापुरात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. राजेंद्र राऊत, आ. समाधान आवताडे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. शहाजीबापू पाटील, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, माजी आमदार नारायण पाटील, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आ. विजयराज शिंदे, डॉ. नितीन ढेपे, यशवंत ढेपे, गणेश सुरडकर, मल्लिकार्जुन गुरव, गणपती फुलारी, बाळासाहेब क्षीरसागर यांच्यासह सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार व विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलनाने अधिवेशनाची सुरुवात झाली.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, संत काशीबा युवा विकास योजनेला सुरूवातीला ५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर पुढे पुढे या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे, त्यानंतर निधीतही वाढ करू, कोणत्याही परिस्थितीत या योजनेला निधी कमी पडणार नसल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी गुरव समाजाच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, सर्व मागण्यांचा प्राधान्याने विचार करू असे सांगितले. पालकमंत्री यांनीही गुरव समाजाच्या अधिवेशनात मार्गदर्शनपर भाषण करून गुरव समाजाचे कौतुक केले.
चांगले काम अन् निर्णयावरही टीका...
राज्यात सरकारच्या चांगल्या कामाबरोबरच निर्णयावरही सातत्याने टीका होताना दिसते. टीका करणारे स्पर्धक वाढल्याचे जाणवते; पण आम्ही याला खतपाणी न घालता या आरोपांना चांगल्या कामाने उत्तर देऊ. एवढेच नव्हे, जेवढे आरोप होतील त्यापेक्षाही जास्त काम करून विरोधकांना उत्तर देऊ असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगाविला.
या होत्या समाजाच्या मागण्या...
- संत काशीबा आर्थिक महामंडळ स्थापन करावे
- पुजारी, गुरव यांना दरमहा २५ हजाराचे मानधन द्यावे
- गुरव समाजाला कायदा करून कायदेशीर संरक्षण द्यावे
- देवस्थानच्या इनाम वर्ग ३ प्रमाणे जमिनी मिळाव्यात
- जमिनी परत मिळवून देवस्थानाच्या ताब्यात द्याव्यात
- मुला-मुलींसाठी जिल्हानिहाय वसतीगृहांची निर्मिती करा