मालवणच्या वीज पुरवठ्यासाठी सरसावले कुर्डूवाडीचे पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:23 AM2021-05-27T04:23:36+5:302021-05-27T04:23:36+5:30
कुर्डूवाडी : तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणची यंत्रणा बाधित झाली आहे. त्यामुळे अनेक गावांतील खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत ...
कुर्डूवाडी : तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणची यंत्रणा बाधित झाली आहे. त्यामुळे अनेक गावांतील खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महावितरणचा कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने त्यांच्या मदतीला कुर्डूवाडी येथील दत्तगुरू इलेक्ट्रिकलचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले आहे. संततधार पावसात अहोरात्र प्रयत्न करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत आहेत.
चक्रीवादळात सिंधुदुर्ग महावितरणची सेवा विस्कळीत झाली. वीज वितरण सेवा पूर्ववत करण्यासाठी बारामती परिमंडळ यांच्याकडून कुर्डूवाडी येथील दत्तगुरू इलेक्ट्रिकल या एजन्सीला मदतीसाठी बोलाविण्यात आल्याचे दत्तगुरू इलेक्ट्रिकलचे मालक गव्हर्मेंट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर स्वप्निल गायकवाड यांनी सांगितले.
मालवण परिसरात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी १८ मे ते २४ मे दरम्यान या पथकाने परिश्रम घेतले. चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील ४३९ गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. तो सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे. विद्युत पोल उभा करणे, तारा ओढणे, डीपीचे पोल उभे करणे आदी कामे करण्यात येत आहेत. अक्षय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली २० जणांचे पथक या मोहिमेत सहभागी झाले होते. (वा. प्र.)