कुडलच्या सरपंचाने ग्रामस्थांचाही विश्वास गमावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:15 AM2021-07-08T04:15:54+5:302021-07-08T04:15:54+5:30
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुडल संगम ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल जगदेव पाटील हे थेट जनतेतून निवडून आले होते. ग्रामपंचायतीच्या ७ पैकी ...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुडल संगम ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल जगदेव पाटील हे थेट जनतेतून निवडून आले होते. ग्रामपंचायतीच्या ७ पैकी ५ जागा भाजपाच्या संगप्पा केरके यांच्या गटाने जिंकल्या तर दोन सदस्यासह सरपंचपद काँग्रेसच्या शिवानंद पाटील गटाने काबीज केले. या गटाचा एक सदस्य भाजपाच्या गोटात गेल्याने सरपंच अनिल पाटील यांच्याविरोधात सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. हा ठराव ६ विरुद्ध १ मताने मंजूर झाला. मात्र अनिल पाटील थेट जनतेतून सरपंच झाल्याने या अविश्वास ठरावाला ग्रामसभेचीही मान्यता आवश्यक होती.
तहसीलदार अमोल कुंभार यांच्या उपस्थितीत बुधवारी विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. त्यात सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत १५ जानेवारी २०२१ रोजीच्या मतदार यादीनुसार ग्रामस्थांची नोंदणी करण्यात आली. दुपारी १२:३० ते चार वाजेपर्यंत नोंदलेल्या मतदारांचे मतदान घेण्यात आले. त्यानंतर निकाल घोषित करण्यात आला. यात ग्रामस्थांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने कौल दिला. अवघ्या तीन मताने अनिल पाटील यांना सरपंचपद गमवावे लागले.
--------
चुरशीने ८८.५४ टक्के मतदान
एकूण मतदार ५७६
ग्रामसभेसाठी नोंदणी ५१०
झालेले मतदान ५१०
अविश्वास ठरावाच्या बाजूने २५४
ठरावाच्या विरोधात २५१
बाद मते ५
----------
सारा गाव लोटला मतदानाला
जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यापासून कुडल संगम गावात उत्साहाचे वारे संचारले होते. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी सहा सदस्यांनी दाखल केलेला ठराव २२ फेब्रुवारी रोजी मंजूर झाला. मात्र कोरोनामुळे ग्रामसभा घेता आली नाही. दरम्यानच्या काळात गेले पाच महिने दोन्ही गट राजकीय व्यूहरचनेत गुंतले होते. बुधवारच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी उत्साहाने भाग घेतला. नोंदणी आणि मतदानासाठी मोठी गर्दी दिसून आली.
--------
तगडी शासकीय यंत्रणा कामाला
तहसीलदार अमोल कुंभार यांनी विशेष ग्रामसभेच्या आयोजनाची जय्यत तयारी केली होती. या सभेसाठी स्वतः तहसीलदार अमोल कुंभार, निवासी नायब तहसीलदार शुभांगी जाधव, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे बीडीओ राहुल देसाई, दोन मंडल अधिकारी, १० तलाठी, दोन ग्रामविस्तार अधिकारी, सहा ग्रामसेवक, चार पोलीस अशी शासकीय यंत्रणा तैनात करण्यात आली होती.
------
उपसरपंचाना अधिकार
विशेष ग्रामसभेने अनिल पाटील यांच्या या विरोधात कौल दिल्याने त्यांचे सरपंचपद संपुष्टात आले. ग्रामपंचायत अधिनियमानुसार पद रिक्त झाल्याने उपसरपंच प्रमोद (पिंटू) सूर्यवंशी यांना ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे अधिकार मिळणार आहेत.
-------
फोटो ओळी
कुडल ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत मतदान करण्यासाठी ग्रामस्थांनी अशी भली मोठी रांग लावली होती.