सरपंचांनी घेतला पुढाकार अन् अक्कलकोट तालुक्यात झाले शंभर टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 06:22 PM2021-12-24T18:22:22+5:302021-12-24T18:22:28+5:30
अक्कलकोट तालुका: घरोघरी जाऊन डोस दिल्याने वाढला वेग
सोलापूर: गाव करील ते राव काय करील, अशी एक म्हण आहे. याचा प्रत्यय अक्कलकोट तालुक्यात आला आहे. साेलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्याने शंभर टक्के लसीकरणाचा पहिला मान मिळविला आहे. हे घडलं ते सरपंचांच्या पुढाकाराने, असे आरोग्य अधिकारी सांगत आहेत.
कोरोना महामारी सुरू झाल्यावर सोलापूर शहरापासून ३५ किलोमीटर असलेल्या अक्कलकोटमध्ये संसर्ग झाला. याचे लोण तालुक्यात पसरत गेले; पण आरोग्य, महसूल, पोलीस यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम केले. जिल्हाधकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्या आवाहनाला सरपंच व ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे संसर्ग कमी करण्यास मदत झाली. त्यानंतर लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला लोकांचा प्रतिसाद कमी होता. त्यामुळे आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन लस देण्यास प्रारंभ केला. यासाठी गावचे सरपंच, अंगणवाडी सेविका, आशा, ग्रामसेवक यांनी परिश्रम घेतले. ऑक्टोबरमध्ये सलग ३६ तास लसीकरण करण्यात आल्याने पहिला डोस देण्याचे १०१ टक्के उद्दिष्ठ साध्य झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. करजखेडे यांनी सांगितले.
हा बदल केला
लसीकरणाला पहिल्यांदा प्रतिसाद नव्हता. दुसऱ्या लाटेत संसर्ग वाढल्यावर दवंडीद्वारे लोकांना कोरोना लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. घरोघरी लसीकरणाचा निर्णय होण्याआधीच येथील कर्मचारी घराघरात पोहोचले होते. त्यामुळे लसीकरण वाढले.
यामुळे वाढले लाभार्थी
दुसरी लाट सुरू झाल्यावर लोकांनी धास्ती घेतली. लसीचा पुरवठा कमी होता. त्यामुळे सोलापूर शहर व कर्नाटकातील लोक लसीकरण केंद्रावर आले. उसतोड मजुरांना लस देण्यात आली. अक्कलकोटला आलेल्या भाविकांनीही डोस घेतले. त्यामुळे ग्रामीण भागात अजूनही लोक पहिला डोस घेत आहेत. या कारणांमुळे लसीकरणाचा टक्का वाढल्याचे दिसत आहे.
अशी आहे अक्कलकोटची स्थिती
- गावे: १३७
- आरोग्य केंद्र: ४७
- कोरोना बाधित: ४५८०
- मृत्यू: २०७
- लसीकरण: १०१ टक्के
- पात्र लाभार्थी: २५२०५०
- पहिला डोस: २५३५४१
- दुसरा डोस: १५२५९१