सर्पदंशाने सर्पमित्राचा मृत्यू, सोलापूरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:29 AM2018-09-18T10:29:22+5:302018-09-18T10:32:48+5:30
सोलापूर : जुळे सोलापुरातील निरापाम सोसायटीजवळ एकाच्या घरात साप जाताना सर्पमित्र उदयसिंग सिताराम कल्लावाले (रा. सत्यनारायण सोसायटी) यांनी पाहिले़ कोणालाही सर्पदंश होऊ नये म्हणून सापाला बाटलीत पकडून शेतात सोडण्यासाठी घेऊन जात असताना उदयसिंग यांनाच सापाने दंश केला़ उपचारादरम्यान सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
मयत उदयसिंग हे निरापाम सोसायटीच्या रोडने घराकडे जात असताना तिथे एकाच्या घरात साप जाण्याच्या मार्गावर होता. तो साप घरामध्ये जाऊन दंश करून कुणाचा तर जीव घेणार म्हणून त्यांनी मोठ्या धाडसाने त्याला पकडले़ सापाला बाटलीत टाकता1ना तब्बल दोन-तीन वेळा सापाने दंश केला. तरीही त्याला पकडून लांब अंतरावर नेऊन सोडून दिले़ आणि घराजवळ येऊन मित्रासोबत गप्पा मारत बसले. सर्पदंश झाल्याचे त्यांनी कोणालाही सांगितले नव्हते.
काही मिनिटांनी हाताच्या अंगठ्याच्या बाजूने रक्तस्त्राव सुरु झाला. मित्रांनी त्यांना हाताला काय झाले असे विचारले असता, त्यांनी सर्पदंश झाल्याचे सांगितले. मित्र आणि नातेवाईकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. अखेर उपचारादरम्यान सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. उदयसिंग हे फरशी बसविण्याचे रोजंदारी काम करत होते. त यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले व बहिण-भाऊ असा परिवार आहे. अशी माहिती त्यांचे मित्र दयानंद खेडगीकर यांनी दिली.