सरसंघचालक मोहन भागवत आज सोलापूर दौर्यावर, अक्कलकोटमधील स्वामी समर्थ महाराजांचे घेतले दर्शन
By Appasaheb.patil | Updated: June 24, 2024 14:23 IST2024-06-24T14:22:57+5:302024-06-24T14:23:15+5:30
स्वामींचे दर्शन घेतल्यामुळे आपण अत्यंत प्रभावित झालो असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले.

सरसंघचालक मोहन भागवत आज सोलापूर दौर्यावर, अक्कलकोटमधील स्वामी समर्थ महाराजांचे घेतले दर्शन
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी सकाळी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. आज श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास प्रत्यक्ष भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा योग आला. ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन स्वामींचे दर्शन घेतल्यामुळे आपण अत्यंत प्रभावित झालो असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांच्या गाभारा मंडपात मोहन भागवत यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी मोहन भागवत बोलत होते. पुढे बोलताना भागवत यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या अध्यात्मिक कार्याची दखल घ्यावी असेच कार्य आहे असेही ते म्हणाले.
याप्रसंगी प्रथमेश इंगळे, गुरुवर्य मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी, जिल्हा प्रचारक प्रशांत पांडकर, तालुका प्रचारक यश कुलकर्णी, तालुका कार्यवाह चेतन जाधव, तालुका संघचालक रवी जोशी, संतोष वगाले, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक महेश स्वामी आदी उपस्थित होते.