सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली सोलापूरात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:19 PM2018-07-11T13:19:44+5:302018-07-11T13:20:42+5:30
कुरुल : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी कामती खुर्द (ता. मोहोळ) येथे संघाचे जिल्हा संघचालक शिवाजीराव पाटील यांच्या निवासस्थानी संध्याकाळी जिल्हा व तालुका कार्यकारिणीची स्वतंत्र बैठक घेऊन सद्यस्थितीची माहिती घेतली.
कामती येथे मोहन भागवत यांचे आगमन झाल्यानंतर स्वागताचे कोणतेच डामडौल नव्हते. त्यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने बसस्थानक ते जिल्हा संघचालक पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत कडक बंदोबस्त होता. आधी जिल्हा त्यानंतर तालुका कार्यकारिणीची बैठक घेतली. बैठकीदरम्यान संघाची दैनंदिन शाखाही घेण्यात आली. भागवत हे या बैठकीसाठी प्रथमच कामती खुर्द येथे आल्याने त्यांना पाहण्यासाठी परिसरातील संघप्रेमी व अन्य नागरिकांची गर्दी होती. मात्र कडक बंदोबस्त असल्याने त्यांची निराशा झाली.
बैठक व शाखा घेऊन सोलापूरकडे मार्गस्थ झाले. यावेळी जिल्हा संघचालक शिवाजी पाटील, जिल्हा कार्यवाह नीलेश भंडारी, जिल्हा सहकार्यवाह मदन मोरे, किरण सुतार, मोहोळ तालुका कार्यवाह अॅड. अमोल देशपांडे, सहकार्यवाह दीपक तरंगे, डॉ. जयंत गोळवलकर, डॉ. अमोल हराळे यांच्यासह कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
प्रवेश नव्हता
बैठक स्थळी संघाच्या कार्यकारिणी सदस्याखेरीज कुणालाही प्रवेश नसल्याने याठिकाणी झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली, सरसंघचालक भागवत यांनी काय सांगितले, काय मार्गदर्शन केले, याची माहिती मिळू शकली नाही.