शिवजयंतीसाठी सातारा सजला

By Admin | Published: February 18, 2015 10:39 PM2015-02-18T22:39:19+5:302015-02-18T23:49:28+5:30

तरुणाई तेजाळली : शहरातील पेठांना पताकांचे तोरण; शिवज्योत आणण्यासाठी युवकांची स्वारी गडांवर

Satara decorates for Shiv Jayanti | शिवजयंतीसाठी सातारा सजला

शिवजयंतीसाठी सातारा सजला

googlenewsNext

सातारा : आज छत्रपती शिवरायांची जयंती जिल्ह्यात साजरी होत आहे. शिवरायांचा पराक्रम नुसता ऐकून मरणासन्न अवस्थेला टेकलेल्या माणसाच्या अंगातही चैतन्याची लाट उसळते. मग ही तर सळसळत्या रक्ताची तरुणाई आहे. डोगरकपाऱ्यातील पाऊलवाटा तुडवत मैलोन्मैल धावत जाऊन शिवज्योत आणण्यासाठी युवकांची अनवाणी पावले शिवरायांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या गडांवर पोहोचली आहेत तर शहरातील विविध पेठांमध्ये शिवजयंतीची जय्यत तयारी केली असून पेठांना भगव्या पताकांची तोरणं बांधल्यामुळं अवघा सातारा शिवमय झाला आहे.

आज घुमणार ढोल-ताशांचा आवाज
सातारा : नगरपालिकेच्या वतीने गुरुवार, दि. १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात येणार आहे.
शिवजयंतीनिमित्त राजवाड्यास आकर्षक पद्धतीने विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे. तसेच राजवाडा गांधी मैदान येथील सोमण स्मारक या ठिकाणी शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. पोवई नाका येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे.
राजवाडा येथील शिवप्रतिमेची पूजा सकाळी ८.३० वाजता खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्षा दिनाज शेख, सभापती, नगरसेवक आदींच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
सायंकाळी ५ वाजता शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक राजवाडा येथून सुरू होणार असून, त्यामध्ये प्रथम महारुद्र प्रतिष्ठान, ताल अधिष्ठान, पुणे यांचे ढोल ताशे व ध्वज पथक असे ५० ते ६० कलाकारांचे पथक त्यांची कला सादर करणार आहे. त्यामागे शिवमुद्रा, त्यामागे पालिकेच्या शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांचे झांज पथक, त्यानंतर बालशिवाजी युवा प्रतिष्ठान, महिला मल्लखांब पथक व कोकणी बाजा पथक तसेच शहरातील विविध शैक्षणिक संस्थांचे दहा चित्ररथ सहभागी होणार आहेत.
शिवजयंती उत्साहात सातारकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्षा दिनाज शेख यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

बुरुज, तटबंदीच्या प्रतिकृती
सातारा शहरात केसरकर पेठेतील बालगणेश मंडळाने स्वागतकमान उभारली आहे. कमानीच्या दोन्ही बाजूला बुरूज केले आहेत. तसेच किल्ल्यावरील तटबंदीप्रमाणे रंगरंगोटी करून कापडी भिंती उभारल्या आहेत. ऐतिहासिक देखावे उभारून त्यासमोर शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे.

जिल्हा परिषदेतर्फे प्रतापगडावर उत्सव
सातारा : जिल्हा परिषदेच्या वतीने दि. १९ फेब्रुवारी रोजी प्रतापगडावर शिवजयंती उत्सव होणार आहे. यानिमित्त शिवव्याख्याते व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सतीश कुमदाळे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी दिली.
गुरुवारी सकाळी ८ ते ८.३० ध्वजारोहण व भवानीमातेची पूजा, ८.३० ते ९.३० मिरवणुकीने पुतळयापर्यंत जाणे व पुष्पहार अर्पण करणे, ९.३० ते १०.३० विषय समित्यांची सभा, १०.३० ते ११.४५ शिवचरित्रावर व्याख्यान आणि दुपारी १२.0५ वाजता आरती, असे कार्यक्रम होणार आहेत.
शिवजयंती उत्सवासाठी उपाध्यक्ष रवी साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी श्रीकांत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी कोहिनकर आदी उपस्थित राहणार आहेत. शिवप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन सोनवलकर यांनी केले आहे.

तरुणाईला वेड
‘राजे’ अन् ‘महाराज’चे
खटाव : शिवजयंती हटके पद्धतीने साजरी करण्याची क्रेझ सध्या युवकांमध्ये दिसून येत आहे. कुणी सामाजिक उपक्रम राबवून गरजंूना मदतीचा हात देत आहे तर कुणी साहसी प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम दाखवित आहे. कुणी शिवचरित्रावर आधारित व्याख्यानमाला सुरू केली आहे तर कुणी भव्य मिरवणुकीची तयारी केली आहे. पण खटावमधील तरुणांनी खास शिवजयंतीनिमित्त डोक्यावरील केसांमध्ये ‘राजे, मर्द मराठा अशी नावे कोरली आहेत.
शिवरायांचे फक्त नाव घेतले तरी सर्वाच्या नसानसातून रक्त सळसळते. त्यात तरुणाईचा उत्साह तर अनोखाच असतो. शिवप्रेमी तरुणांकडून शिवजयंती साजरी होत असतानाच यंदा तरुणाईने चक्क महारांची विविध नावे आपल्या डोक्यावर कोरुन महाराजाविषयी असणारे आपले प्रेम व्यक्त केले आहे. काही तरुणांनी डोक्यावर राजे, तर काहींनी मर्द मराठा, महाराज आदी ऐतिहासिक शब्द कोरुन एक वेगळेपण या शिवजयंतीला दाखवून दिले आहे. त्यामुळे सर्वाच्या नजरा या तरुणाईच्या डोक्याकडे न जातील तरच नवल!

महिनाभरापासून तयारी
ज्योत कोठून आणायची, पेहराव कसा करायचा, मिरवणूक कशी काढायची, उपक्रम कोणते राबवायचे याचे नियोजन गेल्या महिनाभरापासून सर्वत्रच सुरू होते. अजिंक्यतारा, रायरेश्वर, प्रतापगड, वर्धनगड, रायगड, सिंधुदुर्ग, अशा किल्ल्यांवरून शिवज्योत आणण्यासाठी तरुण मंडळे रवाना झाली आहेत.
खटावमध्ये व्याख्यानमाला
खटावमध्ये शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दि. १५ पासून शिवजयंतीनिमित्त शिव व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ज्ञानेश पुरंदरे यांनी गुंफले. या वेळी विहिंपचे उत्तम कुदळे, चारुदत्त शेंडे उपस्थित होते. प्रा. किरण जाधव यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Satara decorates for Shiv Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.