सातनदुधनी साठवणूक तलावाला लागली गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:19 AM2021-02-08T04:19:50+5:302021-02-08T04:19:50+5:30
उडगी : सततच्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या अक्कलकोट तालुक्यात यावर्षी जून महिन्यापासून समाधानकारक पाऊस पडल्यामुळे सातनदुधनी येथील ...
उडगी : सततच्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या अक्कलकोट तालुक्यात यावर्षी जून महिन्यापासून समाधानकारक पाऊस पडल्यामुळे सातनदुधनी येथील साठवणूक तलाव ६६. ६७ दशलक्ष घनफूट क्षमता असलेली तब्बल १६ वर्षांनंतर पहिल्यांदाच ५० ते ६० टक्के भरला आहे. परंतु, मागील चार महिन्यापासून तलावाच्या आऊटलेटचा वॉल लिकेज असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. तसेच तलावात व तटबंदीवर काटेरी झुडपे वाढलेली आहेत.
सातनदुधनी परिसरातील शेतकऱ्यांनी याबाबतीत पाटबंधारे विभागाकडे निवेदन देऊन पाठपुरावा केला. तसेच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास पाणी वाया जाऊन भविष्यात शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. म्हणून गळतीला तात्काळ थांबवून दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
----
अक्कलकोट तालुक्यात सातनदुधनी येथील साठवण तलावाची गळती येत्या चार दिवसात थांबवण्याची मागणीबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरु आहेत. तलावाची लवकरच दुरुस्ती होईल.
- प्रकाश बाबा
उपअभियंता जलसंपदा, अक्कलकोट
----
सद्यस्थितीत तलाव बऱ्यापैकी भरून देखील गळती सुरू आहे. तलावात दररोज हजारो लिटर पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे. पाणीपातळी कमी होत आहे. भविष्यात पाणी टंचाई निर्माण झाली तर तलावाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
लक्ष्मण जमादार
शेतकरी
---
ओळी : ०७ सातनदुधनी
सातनदुधनी येथील साठवणूक तलावातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे