वाळू तस्कराने पोलिसांच्याच अंगावर घातला ट्रॅक्टर; कोरवली शिवारातील थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 01:00 PM2019-03-16T13:00:03+5:302019-03-16T13:02:52+5:30
एक पोलीस जखमी, आरोपी फरार, पोलिसांचा तपास सुरू
कुरुल : जिल्ह्यातील वाळूचे ठेके बंद असल्याने वाळूमाफियांचा वाळू चोरीचा धंदा जोरात चालूच आहे. याला पायबंद घालण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या जीवावरच हे वाळूचोर उठले असल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा मोहोळ-विजयपूर रस्त्यावरील कोरवली हद्दीत घडली आहे. कारवाई करत असताना वाळू चोरांनी चक्क ट्रॅक्टर पोलिसांच्याच अंगावर घातला.
रात्री उशिरा कोरवली हद्दीत पेट्रोलिंग करण्यासाठी गेलेल्या कामती पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना गुंजेगाव रस्त्याने सीना नदीतून वाळू चोरी करून कोरवली हद्दीत ट्रॅक्टर घेऊन चार जण निघाले असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे या वाहनाची चौकशी करण्यासाठी ट्रॅक्टरच्या समोर पोलीस नाईक माळी व यलपले यांनी मोटरसायकल (क्रमांक एम. एच. १३/ सी. झेड. ६२६८) आडवी लावून थांबवण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने पोलिसांनाच जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या मोटरसायकलला ठोकरून ट्रॅक्टरसह चार जणांनी पलायन केले.
यात पोलीस शिपाई चंद्रकांत माळी हे जखमी झाले असून, मोटरसायकलचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात कामती पोलीस ठाण्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहोळ-विजयपूर रस्त्यावर असलेल्या कोरवली हद्दीत सोमवारी रात्री उशिरा हायवे पेट्रोलिंगचे पोलीस नाईक चंद्रकांत माळी व येलपले हे गेले असता त्यांना कोरवली कॅनॉलवर वाळू चोरीचा ट्रॅक्टर उभारला असल्याचे समजले. त्यामुळे अवैध वाळू उपसा कारवाई करण्यासाठी गेलेल्या या पोलिसांच्याच अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल चौघांविरुद्ध कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्यावर गुन्हा दाखल
- बब्रुवान गंगाप्पा लोणारी, व्यंकटेश बब्रुवान लोणारी, मारुती बब्रुवान लोणारी व एक अनोळखी इसम (सर्व जण रा . गुंजेगाव, ता. दक्षिण सोलापूर) यांनी दोन पोलिसांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून ३०७, ३५३, ३३२ ,३७९ ,३४ व पर्यावरण संरक्षण अधिनियम ९ व १५ अन्वये कामती पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी फरार झाले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक किरण उंदरे तपास करीत असून, आरोपींचा शोध चालू आहे.