इतिहास जतन करा, ‘बाजीराव विहीर’ बुजवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:17 AM2020-12-09T04:17:49+5:302020-12-09T04:17:49+5:30
पंढरपूर : पंढरपूर-पुणे या संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू असून, हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ आहे. ...
पंढरपूर : पंढरपूर-पुणे या संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू असून, हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ आहे. या मार्गावरील वाखरी (ता. पंढरपूर) येथे पुरातन अतिशय सुबक पद्धतीने बांधलेली ‘बाजीराव विहीर’ ही वास्तू आहे. ही वास्तू रस्त्यांच्या रुंदीकरणात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे इतिहास जतन करा, बाजीराव विहीर बुजवू नका, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पालखी मार्गावरून पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांना या विहिरीत उतरून हातपाय धुणे व पाणी पिण्यासाठी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी ही विहीर बांधल्याचे सांगण्यात येते. आजही याच ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे होणारे उभे व गोल रिंगण बाजीरावाच्या विहिरीचे रिंगण म्हणून शेकडो वर्षांपासून प्रसिद्ध आहे.
सध्या केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या विभागातर्फे वारकऱ्यांना सहा पदरी पालखी मार्गावरून येता यावे यासाठी नव्याने संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. याच मार्गावर अधिकाऱ्यांनी सर्व्हे करताना ही बाजीराव विहीर पाडून त्यावरून गावासाठी बनविण्यात येणारा सर्व्हिसरोड नेण्याची तयारी सुरू केली आहे. आता थेट हे काम ही बांधीव विहीर पाडण्यापर्यंत येऊन ठेपल्यावर ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायाने आक्रमक होत हे काम बंद पाडले आहे.
वारकऱ्यांसाठी मार्ग करताना वारकऱ्यांच्या शेकडो वर्षांच्या विसाव्याचे आणि श्रद्धेचे ठिकाण असलेली ही बाजीराव विहीर नष्ट करू नका, असे नवनाथ माने, संतोष ननवरे, ईश्वर सुरवसे, समाधान सुरवसे, गणेश पाटील, श्रीधर यलमार यांनी केली आहे.
२०० वर्षांची प्राचीन बाजीराव विहीर जतन करा; पुरातत्व विभागाचे पत्र
वाखरी (ता. पंढरपूर) येथील बाजीराव विहीर जवळपास २०० वर्ष जुनी आहे. ती नियमानुसार प्राचीन स्मारकाच्या व्याख्येत मोडते. ती नष्ट करू नये, असे पत्र राष्ट्रीय महार्माग अधिकाऱ्यांना पुरातत्व विभागाचे सहायक संचालक वि. पुं. वाहणे यांनी दिले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरजवळील वाखरी येथे मध्ययुगीन काळातील जुनी बाजीराव विहीर ही राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. पंढरपूर यथील श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या पूजेसाठी तुळशी फुलांचा बाग वाखर येथे केला होता. व त्याच जमिनीत विहीर असल्याने ही विहीर विठ्ठलाच्या सेवेसाठी दुसरे बाजीराव पेशवे यांनी अर्पण केलेली ऐतिहासिक विहीर आहे. या विहिरीवरून जाणारा राष्ट्रीय महामार्ग विहिरीस वळसा घालून पेढे न्यावा, अशी विनंती इतिहास संशोधक व मोडी लिपी तज्ज्ञ राज मेमाणे यांनी पत्रान्वये केली आहे.
बाजीराव विहिरीच्या पायऱ्या उत्तम बांधकामाचा नमुना आहे. विहीर जवळपास २०० वर्षे जुनी आहे. ती नियमानुसार प्राचीन स्मारकाच्या व्याख्येत मोडते. ही विहीर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात नष्ट करण्यात येऊ नये. याबाबत संबंधितास उचित आदेश करून प्राचीन वारसा जपण्यास सहकार्य करावे, असे पत्र सोलापूर जिल्हाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकृत अधिकारी यांना पुरातत्व विभागाचे सहायक संचालक वि. पुं. वाहणे यांनी दिले आहे.
नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी दिली भेट
बाजीराव विहिरीच्या ठिकाणी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हिसरोड कमी करणे आणि सर्व्हिस रोड वळविणे असे दोन प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवले आहेत. त्यामुळे बाजीराव विहीर नामशेष होणार नसल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
फोटो लाईन : ०७पंड०६
पंढरपूर-पुणे महामार्गावरील ऐतिहासिक बाजीराव विहीर. (छाया - सचिन कांबळे)