मला वाचवा... भाचीची हाक.. अन् मामा धावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:12 AM2021-01-08T05:12:59+5:302021-01-08T05:12:59+5:30
मोहोळ तालुक्यातील एका गावात मामाच्या घरी अल्पवयीन भाची राहण्यास होती. तेथे तिचे आई - वडील आले. मुलीला २ दिवस ...
मोहोळ तालुक्यातील एका गावात मामाच्या घरी अल्पवयीन भाची राहण्यास होती. तेथे तिचे आई - वडील आले. मुलीला २ दिवस पंढरपूर तालुक्यात एका गावात घेऊन जातो म्हणून सोबत घेऊन गेले. यानंतर त्या मुलीने घरातील सर्वजण माझे लग्न लावून देत असल्याचा फोन मामाला केला. यानंतर मामा मुलीच्या घरी गेला असता मुलीच्या आई-वडिलांनी मुलीचे लग्न लावून दिल्याचे सांगितले. यामुळे मामाने मुलीचे आई-वडील, पती व त्याच्या घरातील लोकांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यामुळे मुलीचे आई-वडील, नवरा व अनंता महादेव शेळके, पद्मिनी अनंता शेळके, प्रणव नागनाथ सपाटे, सुलभा नागनाथ सपाटे, सिंधू चंद्रकांत शेळके, चंद्रकांत नरहरी शेळके यांच्या विरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती किरण अवचर यांनी दिली.
मामा, घरातील लोक माझे बळजबरीने लग्न लावून देत आहेत, तुम्ही मला न्यायला या. मला वाचवा, असे बालविवाह झालेली अल्पवयीन भाची मामीच्या मोबाइलवर बोलली. याबाबतची व्हॉइस क्लिप मामाने पोलिसांना ऐकवली.