हजारो साप वाचवले; शेकडो सर्पमित्र घडवणाऱ्या सर्पमित्र मुच्छाले यांचं निधन
By शीतलकुमार कांबळे | Published: October 13, 2023 01:34 PM2023-10-13T13:34:23+5:302023-10-13T13:34:48+5:30
हजारो साप वाचविले : मुत्रपिंडाच्या आजाराने जीवनाची अखेर
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : शहर व जिल्ह्यामध्ये हजारो सापांना वाचविणारे, शेकडो सर्पमित्र तयार करणारे सर्पमित्र, वन्यजीवप्रेमी अशपाक मुच्छाले (वय 50, रा. कस्तुरबाग नगर, होटगी रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील आपला मार्गदर्शक हरपल्याची भावना वन्यजीवप्रेमीं, सर्पमित्रांनी व्यक्त केली. जिल्ह्याचे पहिले सर्पमित्र गफूर मुच्छाले हे अशपाक मुच्छाले यांचे वडिल होतं. आपल्या वडिलांकडून अशपाक यांनी सर्प पकडण्याचे प्रशिक्षण घेतले. वयाच्या 14 व्या वर्षापासून त्यांनी सर्प वाचविण्याच्या कामास सुरुवात केली. लोकांमध्ये सापाविषयी भीती असल्याने ते साप दिसला की मारत असतं. सापांना मारु नये, ते अन्नसाखळीतील महत्वाचा घटक आहे. याबाबत अशपाक मुच्छाले यांनी जागृती केली.
काही वर्षांपूर्वी जीवंत सापाच्या प्रदर्शनास बंदी नव्हती. त्यावेळी त्यांनी सापांची माहिती देत, जिल्ह्यात आढळणारे बहुतांश साप हे बिनविषारी असल्याचे कार्यक्रमातून लोकांनी सांगितले. मागील काही वर्षांपासून अशपाक मुच्छाले यांना किडनीच्या आजाराचा त्रास होत होता. त्यांना डायलिसीस करावे लागत होते. यासोबतच त्यांना रक्तदाब व मधुमेहाचा आजार जडला होता. त्यामुळे त्यांनी सर्प संवर्धनाचे काम बंद केले होते. मात्र, त्यांच्याकडे येणाऱ्या. युवकांना ते मार्गदर्शन करत होते. पक्षी निरिक्षणाचा अभ्यास ही करत होते. त्यांच्या या आवडीतून त्यांनी अनेक युवकांना प्रशिक्षण देऊन घडविले.